
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधीश’ बंगला पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या बंगल्याचे बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याबद्दल मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने राणे यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी 10 जून रोजी उपस्थित राहण्याचे राणे यांना आदेश देण्यात आले आहेत.
‘अधीश’ या बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत यापूर्वी मुंबई महानगरपालिकेनेही नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती. सीआरझेडचे उल्लंघन झाल्याबाबत सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही राणे यांच्याबद्दल तक्रार आली होती. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱयांच्या अखत्यारीत येणाऱया सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन कमिटीने राणे यांना नोटीस बजावली आहे.
गैरहजर राहिल्यास कारवाईचा बडगा
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावलेल्या या नोटिसीमध्ये राणे यांना गंभीर इशाराही दिला आहे. सुनावणीला उपस्थित न राहिल्यास तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असे समजून आम्ही पुढील कारवाई करू, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

























































