छिंदम तडीपारच! जिल्हा न्यायालयाने पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम याने तडीपारीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने छिंदम याचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळून लावत तडीपारी कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.

छिंदम याच्याविरुद्ध प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी तडीपारीचा आदेश काढला होता. या आदेशाविरुद्ध छिंदम याने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिल सरोदे यांनी युक्तिवाद केला. छिंदम याने उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, छिंदम याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छिंदम पुन्हा निवडणूक लढवत असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. छिंदम हा गुन्हेगारी स्वरुपाचा असून, त्याच्याविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हद्दपारीचा आदेश कायम रहावा, असा असा युक्तिवाद केला. अ‍ॅड. एस.आर. सय्यद यांनी छिंदमच्या जीवितास धोका असून, तो घरीच सुरक्षित राहू शकतो, असे युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून छिंदमचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला.