कोण आहे अलक्ष्मी…’असे’ टाळा दुष्प्रभाव….

दिवाळीच्या रात्री भगवान गणेश आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी पजूनासाठी घर स्वच्छ करून ते सजवले जाते. घरासमोर रांगोळी काढून दिवे लावले जातात. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आगमन करून वर्षभर घरात निवास करते, अशी मान्यता आहे. मात्र, दिवाळीच्या काळात घरात अस्वच्छता आणि नाटनेटकेपणा नसेल तर माता लक्ष्मी नाराज होत निघून जाते आणि त्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते, असे मानले जाते. अलक्ष्मी म्हणजे कोण आणि तिचे दुष्प्रभआव कसे टाळावे, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

अलक्ष्मी ही लक्ष्मीदेवीची मोठी बहिण असून तिला जेष्ठालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. लक्ष्मीच्या विपरीत अलक्ष्मीचे गुण आहेत. त्यामुळे अलक्ष्मीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याबाबतची एक पौराणिक कथा सांगण्यात येते.

देवासूर समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी समुद्रातून निघाली होती. त्यामुळए तिला लक्ष्मीची मोठी बहिण मानण्यात येते. मात्र, अलक्ष्मीला 14 रत्नांमध्ये मोजण्यात येत नाही. अलक्ष्मीला जेष्ठा लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. लक्ष्मीच्या विपरीत हिचे गुण आहेत. लक्ष्मी ही शौर्य, विजय,धन, सुख, समृद्धी यांची प्रतिक आहे. तर कष्ट, क्लेश, त्रास, दरिद्रता आणि अपयश यांचे प्रतिक अलक्ष्मी आहे.

समुद्रमंथनातून अलक्ष्मी उत्पन्न झाल्यावर देव किंवा असूर यांनी तिचा स्विकार केला नाही. त्यामुळे भगवान विष्णूंच्या आदेशानुसार अस्वच्छता आणि कलह असणाऱ्या ठिकाणी अलक्ष्मी निवास करते. स्त्री आणि आईवडिलांचा अपमान करणे, जुगार खेळणे तसेच मद्यपान करणाऱ्यांकडे अलक्ष्मी वास करते. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या, असे तज्ज्ञांनी सांगितले.

दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी झाला होता. विवाहानंतर मुनी अलक्ष्मीला घेऊन आश्रमात गेले त्यावेळी अलक्ष्मीने आश्रमात प्रवेश करण्यास नकार दिला. आश्रमात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि शांतता आहे. भगवान विष्णू यांच्या आदेशानुसार आपण अशा ठिकाणी निवास करू शकत नाही. अशांतता, अस्वच्छता आणि कलह असणाऱ्या ठिकाणी आपण निवास करू शकतो, असे अलक्ष्मीने सांगितले. या कथेनुसार वर्षभर घरात लक्ष्मीचा निवास असण्यासाठी स्वच्छता ठेवावी आणि कलह टाळवेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.