यंदा दिवाळी अंकांची वाट बिकट; अनेकांची माघार, जाहिराती घटल्या, पाने आणि प्रती झाल्या कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी अंक ही मराठी मनांची समृद्ध परंपरा आहे. कितीही अडचणी आल्या तरी दिवाळी अंक मोठय़ा हौसेने प्रकाशित केले जातात. यंदाही 110 वर्षांच्या दिवाळी अंकाच्या परंपरेत खंड पडू नये, असा प्रयत्न झाला असला तरी अनेकांनी त्यातून माघारही घेतली आहे. अंकांच्या जाहिराती मोठय़ा प्रमाणात घटल्या आहेत. अनेकांनी पानांची संख्या कमी करून कमी प्रती बाजारात आणायचे ठरवले आहे. एवढे करून वाचकांपर्यंत पोचण्याची चिंता आहेच. त्यामुळे यंदा कोरोनामुळे दिवाळी अंकांची वाट बिकट आहे, असेच म्हणावे लागेल.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळी अंक प्रकाशित करणे हे धाडसाचे काम झाले आहे. कागद आणि इतर साहित्य महागणे, छपाई, वाहतूक, कर्मचाऱयांचे वेतन असे खर्च वाढल्याने दिवाळी अंकांची निर्मिती ही अतिशय खर्चिक बाब झाली आहे. जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. त्यातच अलीकडच्या वर्षांत नोटबंद, तसेच जीएसटीमुळे दिवाळी अंकांचे अर्थकारण बिघडले आहे. आता तर कोरोनामुळे फारच वाट लागली आहे. यंदा दिवाळी अंकांना जाहिराती मिळालेल्या नाहीत. प्रत्यक्ष विक्रीपेक्षा जाहिरात हाच अंकांच्या उत्पन्नाचा स्त्राsत समजला जातो. तोच बंद झाल्याने अनेक लहान अंक यंदा प्रकाशित होणार नाहीत. दरवर्षी साधारण 300 अंक बाजारात यायचे, तिथे अंदाजे 200 अंकच काढले जाणार आहेत. शतायुषी, वसंत, ऑल द बेस्ट सारखे अंक यावर्षी प्रकाशित होणार नाहीत. अनेकांनी जास्त नुकसान होऊ नये म्हणून पृष्ठ संख्या कमी करून, आणि जेमतेम 35 ते 40 टक्के प्रती मार्पेटमध्ये विक्रीसाठी आणायचे ठरवले आहे. विक्रेत्यांकडून होणाऱया विक्रीवर अवलंबून न राहता प्रकाशकांनी एकत्र येऊन दिवाळी अंकांचा संच सवलतीत विकण्याचा मार्गही निवडला आहे.

ऑनलाईनचा पर्याय

कोरोनामुळे जाहिरातींवर प्रचंड परिणाम झाला आहे. केवळ 25 टक्के जाहिराती मिळाल्या आहेत. ज्यांनी जूनमध्ये तयारी केली होती, त्यांचे दिवाळी अंक वेळेवर बाजारात येतील. 50 टक्के ऑनलाईन अंक असतील, अशी माहिती दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना ’दिवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विजय पाध्ये यांनी दिली. दिवा प्रतिष्ठानचे 125 सदस्य आहेत. त्यातील 80 ते 85 सदस्यांचे अंक येतील, असे विजय पाध्ये यांनी सांगितले.

किमती थोडय़ा वाढतील

आमच्याकडे सध्या 15 ते 20 अंक विक्रीसाठी आले आहेत. येत्या काही दिवसांत साधारण 200 तरी अंक निघतील, असा अंदाज आहे. अंकांच्या किंमती काही प्रमाणात वाढतील असे वाटते. 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ असेल. सगळ्या अंकांच्या किंमती वाढतीलच असे नाही. पाने- किंमतीचे गणित जुळवले जाईल, असे आयडियल बुक डेपोचे मंदार नेरुरकर यांनी सांगितले.