
दिवाळी तोंडावर आली तरी गेल्या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही, दोन वर्षांचा बोनस, ग्रॅच्युइटीही मिळालेली नाही. त्यामुळे ‘एनटीसी’ मिल कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवत बॅलार्ड पियर येथील एनटीसीच्या प्रधान कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
देशपातळीवरील 23 ‘एनटीसी’ गिरण्यांतील कामगार संघटनेच्या राष्ट्रीय समन्वय कृती समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने ऑक्टोबरमध्ये झूम मीटिंग पार पडली होती. तेव्हा एनटीसी प्रशासन केंद्र सरकारने थकीत पगारावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जवळपास 30 हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमार ओढावली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या निर्देशानुसार खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, नागनाथ सोनावणे, अभिजित चव्हाण (बार्शी), मश्चिंद्र येरडावकर, रामकृष्ण बगेर (धुळे) या पदाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी निदर्शन केली. एनटीसीचे कार्यकारी प्रमुख मनोज कुमार यांची शिष्टमंडळाने भेटही घेतली.


























































