
संरक्षणाच्या दृष्टीने गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची राज्य दहशतवादविरोधी पथकातर्फे (एटीएस) पॉलिग्राफ चाचणी करण्यात येण्याची शक्यता आहे. सखोल तपासासाठी गरज भासल्यास डॉ. कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी एटीएसतर्फे करण्यात आली असून त्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरविल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. डॉ. कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत एटीएसने विशेष न्यायालयात अहवाल सादर केला आहे. डॉ. कुरुलकर यांनी नेमकी कोणती माहिती दिली?, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते?, पैशांच्या देवाणघेवाणी बाबतची माहिती या पॉलिग्राफ चाचणीतून मिळू शकतील. त्यामुळे ही चाचणी करण्याची मागणी एटीएसतर्फे करण्यात आली आहे.
नाशिक कनेक्शन
डॉ. कुरुलकर प्रकरणात आणखी दोन संशयित मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. डॉ. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून यामध्ये हे दोन क्रमांक आढळून आले आहेत. हे दोन्ही मोबाईल क्रमांक नाशिकमधील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एटीएसच्या नाशिक येथील पथकाकडे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हे दोन मोबाईल क्रमांकाचे वापरकर्ते कोण आहेत? याचा तपास सुरू आहे.
डॉ. कुरुलकर प्रकरणात एटीएसने आत्तायर्पंत आठ जणांचे जबाब नोंदविले आहेत. डॉ. कुरुलकर यांच्या मोबाईल क्रमांकाचे, तसेच मोबाईल संचातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. दिघीतील संरक्षण आणि संशोधन कार्यालयातील एका अधिकाऱयाचा, तर डॉ. कुरुलकर यांच्या कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका व्यक्तीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.






























































