
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे खेर्डा येथील डॉक्टर नामदेव शंकर गिरी यांनी या छळास कंटाळत आत्महत्या केली, अशी तक्रार मृताच्या पत्नीने दिल्याने दोघांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश कुमार जिवणे याला पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. नामदेव शंकर गिरी हे उदगीर येथील स्वामी विवेकानंद नगर येथे राहत होते. महेश कुमार जिवणे व विकास देशमाने या दोघांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. रक्कम नाही दिली तर ठार मारण्याची धमकी दिली होती. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून 25 मे रोजी डॉ. नामदेव गिरी यांनी घरातील फवारणीचे विषारी औषध पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान 31 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुनंदा नामदेव गिरी (वय 43, रा. खेर्डा, हा.मु. स्वामी विवेकानंद नगर, उदगीर) यांच्या तक्रारीवरुन वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी महेश कुमार जिवणे याला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.के. गायकवाड करीत आहेत.

























































