सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत… डोंबिवलीत ‘एक रात्र कवितेची’, 40 कवींनी नोंदवला विक्रम

‘खोल खोल दरित गो… चांन्याची फुला… हरया काळय़ा डोंगरार चांन्ना गो इला’ या कवितेच्या मखमली ओळी कोकणच्या लाल मातीतील ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांनी आपल्या गोड गळय़ातून सादर केल्या आणि संपूर्ण सभागृहात जणू शब्दांचे चांदणेच पसरले. निमित्त होते काव्यरसिक मंडळाने आयोजित केलेल्या ‘एक रात्र कवितेची’ या अनोख्या मैफलीचे. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत रंगलेल्या या मैफलीत नव्या व जुन्या पिढीतील 40 कवींनी आपले रंग भरले. मुक्तछंद, गझल, हायकू, वृत्तबद्ध कविता असे अनेक प्रकार रसिकांना अनुभवता आले.

मराठी कवितेच्या क्षेत्रात 50 हून अधिक वर्षे काव्य साधना करीत असलेल्या काव्यरसिक मंडळाच्या वतीने शनिवारी रात्री शुभमंगल कार्यालयात हटके मैफल पार पडली. पूर्वी अनेकदा पहाटेपर्यंत काव्य मैफली कल्याण, डोंबिवली परिसरात व्हायच्या. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरच्या जमान्यात रात्री उशिरापर्यंत रंगणाऱया मैफली बंद झाल्या. काव्यरसिक मंडळाने पुन्हा एकदा कवितेची ऑफलाइन मैफल भरवली आणि सर्वांनाच कवितेचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा आठवला.

मैफलीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी त्यांची प्रसिद्ध ‘आम्ही चिल्लर, सुट्टे पैसे भुक्कड’ ही कविता सादर केली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांनीदेखील आपल्या कविता व गझलांमधून दाद मिळवली.

आपल्या गझलेत ते म्हणाले

कोकणचे कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कवितांनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. ‘जगातली हर एक सासू आपल्या जावयाक हातावैल्या पह्डासारखी जपता’ ही त्यांची मुक्तछंदातील कवितादेखील दाद मिळवून गेली. निशा काळे यांची ‘रानात गर्द घनदाट हरवली वाट दिसेना काठ कुठे डोहाचा’ ही कविता प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली. मानसी जोशी, मृणाल केळकर, संगीता बाठे, प्रज्ञा कुलकर्णी, वर्षा पाटील, प्रमोद पाटील, राजेश देवरुखकर, हर्षद आचरेकर, अश्विनी म्हात्रे, अमिता चक्रदेव, कल्पना गोरे, रवींद्र सोनवणे, सुरेखा मालवणकर, विजय माळी, संजय पाटील, सुभाष नाईक, विशाल राजगुरू या कवींनी पहाटेपर्यंत झालेल्या कवि संमेलनात आपला रंग भरला.

काव्यरसिक मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला लुकतुके, मेघना पाटील, संदीप मर्ढेकर, जयंत कुलकर्णी, अंजली बापट, दया घोंगे, प्रज्ञा कुलकर्णी, सम्राज्ञी उतगीकर, सानिका गोडसे, स्वाती भाटे, वैदही जोशी, विनय जोशी, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, महेश देशपांडे, अंजली बापट, योगेश वैद्य, मनोज मेहता यांनीदेखील ‘एक रात्र कवितेची’ आपल्या सादरीकरणाने जागवली. निसर्ग, प्रियकर-प्रेयसीमधील संवाद, राजकारणावर ओरखडे, पाऊस अशा विविध विषयांवरील कविता या मैफलीत भाव खाऊन गेल्या.