
टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि ‘गब्बर’ या नावाने चिरपरिचित असणारा शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Sonakshi Sinha) यांच्या ‘डबल एक्सएल’ (Double XL) या चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात धवनची खास भूमिका असून हुमा कुरेशीसोबतचा त्याचा एक रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘डबल एक्सएल’ या चित्रपटाच्या टीझरनंतर नुकताच याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला. यात हुमा कुरेशी माईक आणि पोस्टरसह दिसतेय. आता निर्मात्यांनी क्रीडाप्रेमींनाही खास सरप्राईज दिले आहे. शिखर धवन या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार असून हुमा कुरेशीसोबत डान्स करतानाचा त्याता एक रोमँटिक फोटो समोर आला आहे. एका मुलाखतीदरम्यान शिखरने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना हा निर्णय सहजतेने घेतल्याचे सांगितले.
मी एक खेळाडू म्हणून देशासाठी खेळत आलो आहे. यामुळे जीवन नेहमीच व्यस्त असते. माझा आवडता टाइमपास म्हणजे चांगले चित्रपट पाहणे. जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि मी त्याची कथा ऐकली तेव्हा त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला, असे धवनने सांगितले.
View this post on Instagram
कधी होणार प्रदर्शित?
‘डबल एक्सएल’ ही दोन प्लस साइज महिलांची कथा आहे, ज्या त्यांच्या स्वप्नांच्या शोधात असतात. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केले आहे. सोनाक्षी आणि हुमा व्यतिरिक्त या चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
























































