वर्षभरात नूतनीकरण न केल्यास वाहन परवाना रद्द, नवीन मोटार वाहन कायद्यात तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता एका वर्षाच्या आत वाहन परवान्याचे नूतनीकरण केले नाही तर परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालकाला नव्या परवान्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. या आधी वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी पाच वर्षांची मुदत होती. मात्र, नव्या कायद्यानुसार, हा कालावधी चार वर्षांनी कमी केला आहे.

मोटार वाहन कायद्यात सप्टेंबर महिन्यात सुधारणा केल्यानंतर नवीन कायदा अस्तित्वात आला. त्यात नूतनीकरण एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्या आधी परवाना नूतनीकरणाची तारीख उलटून गेल्यानंतर पाच वर्षांच्या आत दंड भरून परवान्याचे नूतनीकरण करता येत होते.

एका वर्षात कोणी गाडी चालवणे विसरतो का?
नव्या कायद्यातील तरतुदीमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परवान्याच्या नूतनीकरणाची तारीख उलटून गेल्यानंतर अशा प्रकारे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी बोलावलेल्या व्यक्तींनी या कायद्याविरोधात सरकारला जबाबदार धरले. ‘कोणी 50 ते 53 वर्षे गाडी चालवत असेल तर ती व्यक्ती एका वर्षात गाडी चालवणे कसे काय विसरेल,’ असा सवाल त्यांनी केला.

रस्त्यांचा आकार बदलतोय म्हणून टेस्ट आवश्यक
नवीन नियम माहीत नसल्यामुळे अनुभवी वाहनचालकांनाही रांगेत उभे राहून ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत आहे. त्यामुळे सरकार आम्हाला फसवत आहे, अशी भावना वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘सरकार कोणत्याही प्रकारे फसवणूक करत नाही. 15 ते 50 वर्षांचा अनुभव असलेले वाहनचालक गाडी चालवणे विसरत नाहीत, हेही खरे आहे. मात्र, रस्त्यांचा आकार सतत बदलत आहे. त्यामुळे नवीन नियम आणि रस्त्यांशी वाहनचालकांना जुळवून घेता येते का, हे पाहण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे,’ असे परिवहन खात्याच्या अधिकाऱयाचे म्हणणे आहे.