
कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागातील अनेक गावांना पाणी पाजणारा तळहिरा पाझर तलाव तलावातील सुरू असलेल्या पानी उपशामुळे कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांसाठी पुढील काही दिवसांत दुष्काळाचे संकट अधिक गडद होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून तलाव परिसरात पावसाने दडी मारल्याने हा तलाव भरलेला नव्हता. चालू वर्षीही अशीच परिस्थिती राहिल्याने तलावात केवळ 50 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. हा पाणीसाठाही तलाव परिसरातील शेतकऱयांनी शेतीसाठी पाणी उपसा करत संपवला असल्याने आता हा सध्या अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील अनेक गावांत पाणीटंचाई समस्या जाणवणार आहे.
देऊर गावातील शेकडो हेक्टर शेतीसाठी हा तलाव उपयुक्त आहे. तलाव भरल्यानंतर परिसरातील 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरी कूपनलिकांच्या पाणीसाठय़ात वाढ होते. मात्र, तलाव कोरड पडल्याने आता परिसरातील विहिरी कूपनलिका कोरडय़ा पडू लागल्या आहेत. याचा परिणाम या परिसरातील बागायत क्षेत्र कमी होणार आहे. या तलावातील उपसा होणाऱया पाणीसाठय़ाबाबत कोरेगाव तहसीलदार, प्रांताधिकारी यांना कळवूनही त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने आता हा तलाव अखेरची घटका मोजत आहे. आजही या तलावात असलेला 1 ते 2 टक्के पाणीसाठा उपसा केला जात आहे. त्यामुळे आता जनावरांनाही पाणी मिळणं मुश्कील होणार आहे.
कोरेगाव उत्तर दुष्काळी भागाला पाणी पाजणारा तळहिरा पाझर तलाव दुष्काळी परिस्थितीत कायम भरण्यासाठी या तलावात जिहे कठापूर योजनेतील पाणी सोडावे, या मागणीसाठी राजकीय गट-तट बाजूला ठेवून एकत्र या.
– राहुल कदम, सदस्य, माजी जिल्हा परिषद, सातारा

























































