अमेरिकन एअरलाइन्सच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये प्रवाशाची सहप्रवाशावर लघुशंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमान प्रवासात सहप्रवाशांवर लघुशंका करण्याच्या विकृत घटना सुरूच आहेत. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात अशीच एक घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या विमानात एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रविवारी एका हिंदुस्थानी नागरिकाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रवाशाने दारूच्या नशेत हा प्रकार केला. विमानात वाद झाल्यामुळे त्याने सहप्रवाशावर लघुशंका केली.

अमेरिकन एअरलाइन्सच्या AA 292 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी रविवारी रात्री 9 च्या सुमारास आरोपीला पकडले. विमान कंपनीने लँडिंगपूर्वी दिल्ली विमानतळाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कारवाई करत दोन्ही प्रवाशांना पकडले. सीआयएसएफने दोघांनाही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित प्रवाशाने रीतसर तक्रार दाखल केली आहे.

विमानात प्रवास करताना मद्य प्राशन केल्यानंतर काही प्रवाशांनी सहप्रवाशांवर लघवी केल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानात अशीच एक घटना समोर आली होती. या धक्कादायक घटनेत, न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप झाला होता. शंकर मिश्रा असे आरोपीचे नाव असून त्याने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती.