
मुंबईत गेल्या महिनाभरापासून कोसळणाऱया पावसामुळे झाडांची पडझडही मोठय़ा प्रमाणात झाली आहे. यामध्ये तब्बल 113 झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर 205 झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 11 जण जखमी झाले आहेत.
पालिकेच्या हद्दीत एकूण 30 लाख झाडे आहेत. यातील 1 लाख 92 हजार झाडे पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत, तर उर्वरित झाडे खासगी आणि विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आहेत. पालिकेच्या रस्त्यांवर असणाऱया झाडांपैकी 523 धोकादायक झाडे काढून टाकण्यात आली आहेत, तर 9 हजार सोसायटय़ांना फांद्या छाटण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. यानुसार 8,300 सोसायटय़ांनी झाडांच्या फांद्या छाटल्या असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी स्थानिक विभाग कार्यालयात तक्रार करावी.
























































