धोनी नावाची जादू

>> द्वारकानाथ संझगिरी

महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियातली वन डेची मालिका गाजवली असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

फक्त तीन सामन्यांत ‘धोनी संपला का?’ पासून ते ‘‘धोनीला पर्याय नाही’’ इतपत अनेकांनी वैचारिक प्रवास केला. रिषभ पंतच्या पाठीराख्यांनी घोडे मागे घेतले. ही मूळतः महेंद्रसिंग धोनी नावाची जादू आहे.

कधीतरी एक वाक्य मी सचिनबद्दल 2004 मध्ये वगैरे लिहिलं होतं. ‘‘टंगस्टन वायर तुटली की दिवा विझतो. मेण संपलं की मेणबत्ती विझते. पण सूर्य कधी विझत नाही. तो मावळतो, पुन्हा उगवण्यासाठी’’ त्यातला सूर्याचा भाग कधी तरी सुरेश भटांचा मी वाचला असावा. मी त्या ताजमहालाला वीट लावली. मी हे वाक्य धोनीसाठी वापरणार नाही. त्यावेळी सचिनने मध्यान्ह ओलांडली होती, पण सूर्यास्त जवळ आहे असं वाटलं नव्हतं. अत्यंत तौलनिक बुद्धीने, भावनेच्या भोवऱ्यात न गटांगळय़ा खाता विचार केला तर धोनीचा सूर्यास्त जास्तीत जास्त 2019च्या विश्वचषकाच्या पलीकडे जाऊ शकतो हे या वन डे मालिकेने दाखवून दिलं. मी असं म्हणेन की, धोनी आता विश्वचषकाच्या संघात मानाने येऊ शकतो, फक्त त्याच्या पूर्वपुण्याईवर नाही.

पहिल्या वन डेत त्याने रोहित शर्माला चक्क साथ दिली. गाण्याच्या भाषेत सांगायचं तर रोहित शर्मा राग आळवत होता आणि धोनी तंबोऱ्यावर होता. रोहित शर्मा बाद झाला. गाणं संपलं. दुसऱ्या सामन्यात प्रमुख गवई विराट कोहली होता. त्याने मैफल गाजवली. धोनीने ती यशस्वी पूर्ण केली. तिसऱ्या वन डेत धोनी प्रमुख गायक होता. पण ती धोनीची एकटय़ाची मैफल नव्हती. केदार जाधवबरोबर त्याची जुगलबंदी होती. ते डय़ुएट होतं. दोघांनी मैफल गाजवली. धोनी नावाच्या सावलीतून कुठे तरी जुन्हा हाडामांसाच्या धोनीचं तेज दिसलं. पण महान क्रिकेटपटूंच्या बाबतीत ते होतंय. सर डॉन ब्रॅडमन हा एकमेव अपवाद! तारुण्यातली आठ वर्षं दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत होरपळून निघाल्यावरही वयाच्या 38व्या वर्षी त्याच्या परफॉर्मन्समध्ये फारसा फरक पडला नव्हता. शेवटचं शून्य हे नियतीने त्याच्या 99.94 या सरासरीला दृष्ट लागू नये म्हणून लावलेलं तीट होतं. ऑस्ट्रेलिया डावाने जिंकली म्हणून पुढचा डाव त्याला मिळाला नाही. नाहीतर दुसऱ्या डावात त्याने शंभर सरासरी पूर्ण केली असती. आणि तो हिंदुस्थानी नसल्यामुळे शंभर सरासरी नावावर लागेपर्यंत खेळत राहिला नाही. बाकी सर्व महान क्रिकेटपटूंच्या बाबतीत त्यांची मध्यान्ह अखेरपर्यंत टिकली नाही. मध्यरात्रीचा सूर्य एकच सर डॉन ब्रॅडमन!

पण या महान खेळाडूंकडे अनुभवातून कमी झालेल्या आपल्या रिफ्लेक्सेसच्या जोरावर मात करण्याची मोठी शक्ती असते. त्यामुळे अस्ताला जातानाही त्यांचे तेज अधूनमधून फाकताना दिसतं. कपिल देव ओझं बनलाय असं वाटत असताना त्याने 1993 साली ‘हिरो कप’चा अंतिम सामना अप्रतिम गोलंदाजीनं जिंकून दिला होता. सोबर्सचं गुडघ्याचं दुखणं, त्याची अस्ताला चालल्याची भावना बळकट होत असतानाच लॉर्डस्ला इंग्लंडविरुद्ध 1973 साली शेवटचं धुवाँधार शतक ठोकून गेला. धोनीही त्याच अवस्थेहून जातोय.

त्याचं यष्टिरक्षण अजूनही उच्च दर्जाचं आहे. फलंदाजाला यष्टिचीत करताना तो बुद्धिमत्ता आणि कौशल्य दोन्ही वापरताना दिसतो. त्याच्या यष्टिचीत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा डोळय़ाची पापणी उशिरा लवते असं वाटतं. त्याच्या रनिंग बिटविन द विकेटवर वयाचा काहीही परिणाम झालेला नाही. यात पुन्हा कौशल्य, जजमेंटबरोबर स्टॅमिनाचाही मोठा भाग असतो. पूर्वी करायचा ती एक गोष्ट तो सातत्याने करू शकत नाही, ती म्हणजे पॅव्हेलियनमध्ये सेट होऊन येणं. त्यावेळी त्याला पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं शक्य वाटायचं. त्यावेळी 20 चेंडूंत 40 धावा किंवा शेवटच्या षटकात 15-20 धावा ही आव्हानं त्याची बॅट लीलया पेलायची. त्याला पाहून गोलंदाज दबावाखाली यायचा, तो नाही. अशी खेळी तो आता खेळू शकणारच नाही का? कधी तरी खेळेलही, पण त्यात सातत्य नसेल. आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आधी सेट होणं, मग कुणाला तरी बरोबर घेऊन भागीदारी करणं, त्यात कधीतरी दुय्यम भूमिका घेणं, समोरच्या तारुण्याला आपल्या अनुभवाचा फायदा देत त्याचा खेळ उंचावायला मदत करणं वगैरे गोष्टी तो करू शकतो. नव्हे, ऑस्ट्रेलियात त्याने शेवटच्या दोन सामन्यांत तेच केलं. त्याच्या बर्फातल्या मेंदूवर वयाचा परिणाम झालेला नाही. तो तितकाच थंड आहे.

धोनीचा हा नवा अवतारही हिंदुस्थानच्या वन डे संघासाठी अतिशय उपयुक्त आहे. अनुभवाला पर्याय नसतो, यष्टीमागे उभं राहून धोनी जे निरीक्षण करतो, जो सल्ला देतो तो अनमोल असतो. मध्यंतरी दुबईतल्या एशिया कपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा गोंधळल्यावर काही काळ धोनीने सूत्रं हातात घेतली. पाकिस्तानी फलंदाजांचं उसळणं थोपवलं. भरती संपली. समुद्र शांत झाल्यावर त्याने बोट पुन्हा कर्णधाराकडे दिली. हेही महत्त्वाचं असतं. म्हणूनच एकेकाळी इंग्लंडने फक्त फलंदाजी करणाऱ्या आणि तीसुद्धा सातव्या क्रमांकावर अशा माईक ब्रेअर्लीला कर्णधार केलं होतं. कारण क्रिकेट हा फक्त बॅट-बॉलचा खेळ नाही. तो मेंदूचाही खेळ आहे. धोनीच्या त्या आतषबाजीच्या आठवणी आता आठवणीत राहणार; पण एक नवा वेगळा धोनी, कधी मन खट्टू करणारा, कधी आनंद देणारा दिसणार! तो हिंदुस्थानी संघासाठी इंग्लंडमध्ये नक्की फायदेशीर ठरेल. त्याला तसंच स्वीकारलं पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या