
सामना प्रतिनिधी, डहाणू-वाणगाव
मालवणातील चिंदर या गावात ‘गावपळण’ होत असतानाच डहाणू व तलासरी तालुक्यातही वारंवार होणाऱया भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांना ‘गावपळण’ करावी लागणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून येणारा गूढ आवाज आणि भूकंपाचे हादरे यामुळे आदिवासी घरे सोडण्याच्या तयारीत असून सरकारी पातळीवर मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही. शनिवारी रात्रभर 3.1 रिश्टर स्केलचे धक्के बसल्याने रहिवाशांची झोपच उडाली. आज दिवसभरही लहान मोठे धक्के जाणवले. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. कोणत्याही क्षणी भूकंप होईल या भीतीने ग्रामस्थांना अंगणातच थंडीने कुडकुडत रात्र काढावी लागली.
डहाणू व तलासरी तालुका सध्या वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला आहे. डहाणूतील वंकासपाडा, धुंदलवाडी, चिंचले, पारडी, हळदपाडा, आंबोली, सासवंद या गावपाडय़ांना शनिवारी रात्रीपासून भूकंपाचे धक्के जाणवू लागले. रात्रभर 4 ते 5 वेळा मोठा आवाज होत धक्के बसल्याने घरातील भांडी कोसळली. तलासरी तालुक्यातील बोर्डी, डहाणू आणि झाई या गावांनाही भूकंपाचे धक्के बसले. धुंदलवाडीतील हितेश कापडी यांच्या घराची भिंत खचली.
दीड महिन्यापासून गूढ आवाज
3 ऑक्टोबर रोजी डहाणूत पहिल्यांदा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर भूकंपाची मालिका सुरूच आहे. वारंवार घडत असलेल्या भूकंपाच्या घटनांमुळे डहाणू व तलासरीतील रहिवाशांनी गावे सोडण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईपाडा येथे राहत असलेल्या कातकरी समाजाने तर आपली घरे बंद करून भीतीने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी डहाणू व तलासरीत रहिवाशांच्या जनजागृतीसाठी भूकंपापासून कसे रक्षण करावे याचे धडे दिले, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
रात्रभर धक्के, घरांना तडे; रहिवाशांचे ‘जागते रहो!’
सवणे, वडवली, धुंदलवाडी येथील घरांना मोठय़ा प्रमाणावर तडे गेले असून पुन्हा भूकंप झाल्यास येथील घरे कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
























































