गाढ झोपेकरिता रात्री झोपण्यापूर्वी खा ‘हे’ 5 पदार्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेकांना त्रास होतो. झोप अपुरी झाल्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतोच शिवाय दुसऱ्या दिवशी उठल्यावर निरुत्साह जाणवतो, आळस बळावतो. हल्ली आपल्या आजूबाजूला अनेक लोकं निद्रानाशाबद्दल तक्रार करताना आपण ऐकतो. हल्ली बहुतांश लोक गाढ झोपेकरिता विविध प्रकारचे उपाय शोधत असतात. रात्री गाढ झोप लागली तर सकाळी उठल्यावर थकवा नाहीसा होऊन शरीरात ऊर्जा येते. म्हणूनच प्रत्यके व्यक्तिकरिता किमान 7-9 तास गाढ झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरेशा झोपेचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. चांगली झोप घेतल्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो, मेंदूचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी करण्यास मदत होते तसेच स्नायूंच्या विकासासाठीही मदत होते. हे सर्व फायदे मिळण्याकरिता आणि शांत, पुरेशी झोप लागण्याकरिता रात्री झोपण्यापूर्वी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे ठरते.

बदाम
बदामामध्ये मेलाटोनिन हार्मोन खूप चांगल्या प्रमाणात असते. मेलाटोनिन हे संप्रेरक झोपण्याचे आणि उठण्याचे चक्र नियंत्रित करण्यासाठी मदत करते. 28 ग्रॅम बदामामध्ये 77 मिलिग्रॅम मॅग्नेशियम आणि 76 मिलीग्रॅम कॅल्शियम असते, जे स्नायूंना आराम देतात आणि झोप लागण्यास मदत करतात. त्यामुळे गरजेनुसार झोपण्यापूर्वी बदाम खाऊ शकता.

गरम दूध
बरेचदा काही लोक झोपायच्या आधी कोमट दूध पितात. दुधात ट्रिप्टोफॅन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मेलाटोनिन हे चार झोप वाढवणारे घटक आढळतात. हे घटक झोप वाढवण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध पिणे खूप फायदेशीर ठरते. जर दुधात कमी फॅट असतील ते शांत झोपेकरिता फायदेशीर ठरते.

अक्रोड
अक्रोडमध्ये मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि मॅग्नेशियम ही पोषक तत्त्वे असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम अक्रोडमध्ये 158 मिलीग्राम मॅग्नेशियम, 441 मिलीग्राम पोटॅशियम, 98 मायक्रोग्रॅम फोलेट आणि 98 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. अक्रोडमध्ये मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अक्रोड खाण्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो.

मासे
माशांमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी आढळते, जे गाढ लागण्याकरिता मदत करते. माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे जळजळ कमी करणे, हृदयाचे संरक्षण करणे आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यास मदत होते. यामुळे रात्रीच्या जेवणात माशांचे सेवन केल्यास रात्री गाढ झोप येऊ शकते.

कॅमोमाइल चहा
कॅमोमाइल चहा हा आयुर्वेदिक चहा आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहे. यामुळे जळजळ कमी होते, जुनाट आजारांचा धोका कमी होतो. कॅमोमाइल चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, चिंता आणि नैराश्यही कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात काही गुणधर्म आहेत जे झोपेची गुणवत्ता सुधारू शकतात. म्हणून, आवश्यकतेनुसार झोपण्यापूर्वी काही वेळाने या चहाचे सेवन करू शकता.