
लॉकडाऊन काळात ट्रस्टला आलेल्या पैशाचा अपहार करणार्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. राजू कृष्णा चौहान असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जोगेश्वरी येथे राहणार्या महिलेने २०१५ साली एक ट्रस्ट उघडला होती. नागरिकांच्या सेवेसाठी ट्रस्टने एक रुग्णवाहिका घेतली होती. त्या रुग्णवाहिकेत राजू हा चालक म्हणून काम करत होता. लॉकडाऊन काळात नागरिकांच्या मदतीसाठी ट्रस्टने एक हेल्पलाइन सुरू केली होती. त्या हेल्पलाइनवर नागरिक फोन करून देणग्या द्यायचे. तसेच राजू हा प्राण्यांसाठी जे मदत करतात त्यांच्याकडून तो आर्थिक स्वरूपात मदत स्वीकारत असायचा. तसेच ट्रस्टला दान केलेले साहित्य राजू स्वत:च्या फायद्यासाठी वापरत होता.
जून महिन्यात राजू हा अचानक गावी गेला. तेव्हा महिलेने ट्रस्टच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्याना संशय आला. पैशाचा अपहार केल्याप्रकरणी महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या पथकातील अधिकार्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसाना राजूची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी राजूला अटक केली. त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्याने पैशाचा अपहार केल्याचे उघड झाले.
























































