रजनीताई लिमये

  • प्रज्ञा सदावर्ते

विशेष मुलांचा सांभाळ करणे आईवडिलांसाठी मोठी कसोटी असते, अशा मुलांना मायेची ऊब आणि शिक्षणाची संधी नाशिक येथील रजनीताई लिमये यांनी प्रबोधिनी विद्या मंदिरच्या माध्यमातून दिली. रजनीताई यांनी अखंडितपणे चार दशके सेवाभावी वृत्तीने, तळमळीने हे कार्य केले. यामुळे आज शेकडो गतिमंद मुले शिक्षण, प्रशिक्षण मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. रजनीताईंच्या निधनामुळे या मुलांचा आधारवड हरपला आहे. मुलगा गौतम याला मानसिक अपंगत्व असल्याचे लक्षात येताच रजनीताई अस्वस्थ झाल्या होत्या. मात्र मोठ्या जिद्दीने आपल्या मुलासह इतर विशेष मुलांच्या संगोपनाचा, त्यांना स्वावलंबी करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. पुण्यात जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले. १९७७ मध्ये त्यांनी शिक्षणतज्ञ प्र. ग. अकोलकर यांच्या मार्गदर्शनाने डॉ. शिरीष सुळे, कमलताई सारडा, रावसाहेब ओक, कुमुदताई ओक यांच्या मदतीने नाशिकमध्ये पहिली शाळा सुरू केली. घरोघरी जाऊन विशेष मुले शोधली, येथे सुरुवातीला गौतमसह चार मुले शिक्षण घेत होती. या प्रबोधिनी विद्यामंदिरात आता साडेतीनशेहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. उच्चशिक्षित रजनीताई यांनी २५ वर्षे शिक्षिका म्हणून रुंग्ठा विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. सकाळी ही नोकरी आणि दुपारी विशेष मुलांच्या शाळेची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. १९८९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेत पूर्णवेळ प्रबोधिनीसाठी देण्यास सुरुवात केली. या मुलांना स्वावलंबी करून त्यांच्यात आत्मविश्वास रुजविण्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे प्रबोधिनीचा वटवृक्ष झाला. सुसज्ज फिजीओथेरपी सेंटर, प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र, प्रबोधिनी कार्यशाळा, पूर्व प्राथमिक शाळा, सुनंदा केले विद्यामंदिर, वसतिगृह असा विस्तार झाला आहे. आज या संस्थेकडे स्वतःच्या बसेस आहेत. या कार्याचा ध्यास घेऊन त्यांनी विदेशातही अभ्यास दौरे केले, कॅनडा, इंग्लंड येथील विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी दिल्या, तेथे त्यांची व्याख्याने झाली, आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी प्रबंध वाचनही केले. लहान मुलांसाठी ‘गोडूली गाणी ’आणि अनुभवांवर आधारित ‘जागर’, ‘ध्यानीमनी प्रबोधिनी’ ही पुस्तके लिहिली आहेत. गतिमंद मुलांसाठी केलेल्या कार्याबद्दल मानसिक विकलांग मुलांची मायेने जडणघडण कशी करावी, याचा आदर्श रजनीताई यांनी सर्वांसमोर ठेवला, त्यांचे हे योगदान सर्वांच्याच कायम स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या