
एकता कपूर, कंगना रनौत आणि करण जोहर यांना गेल्या वर्षी 26 जानेवारी 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. या तिघांना आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आता नवीन माहितीनुसार, त्यांना हा पुरस्कार 8 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे.
करण जोहर, एकता कपूर आणि कंगना रनौत लवकरच पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा एक शासकीय कार्यक्रम असून यासाठी पुरस्कार विजेत्यांना आधीच निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकता कपूर हिचे वडील आणि बॉलीवूड अभिनेते जितेंद्र देखील उपस्थित राहणार आहे. हा पुरस्कार मिळताना आपले वडील उपस्थित असावेत अशी एकताची इच्छा आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एकता कपूरने ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. ‘’ही बातमी ऐकून मी खूप आनंदी आणि भावूक झाली आहे. मी वयाच्या 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मला खूप बोलले गेले की, तू खूप लहान आहेस आणि तुझा काम करण्याचा निर्णय खूप लवकर घेतला आहे. वर्षानुवर्षे मी हे शिकले आहे की, आपले स्वप्न जगणे कधीही सहज शक्य नसते. आज या मोठ्या सन्मानासाठी माझे नाव पुढे आले आहे, हे जाणून मला कसे वाटते ते मी शब्दांत सांगूच शकत नाही.”
तर कारण जोहर ट्विट करत म्हणाला होता की, ”असं खूप कमी वेळा होत जेव्हा माझ्या तोंडून शब्द फुटत नाही, हा असाच एक प्रसंग आहे. देशातील सर्वात मोठा नागरी पुरस्कारांपैकी..पद्मश्री, मला मिळत असल्याने मी खूप भावूक झालो आहे. आज हा आनंदाचा क्षण शेअर करायला माझे वडील येथे असायला हवे होते. त्यांना माझा अभिमान वाटेल हे मला ठाऊक आहे.”



























































