
‘महावितरण’ने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर ग्राहक वीज बिल भरण्यास सरसावले आहेत. मागील महिनाभरात पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांनी 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीज बिलांचा भरणा केला आहे. अद्यापी एक हजार 384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान, खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
15 फेब्रुवारीपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिह्यांत 27 लाख 72 हजार 360 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे असलेली एक हजार 864 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष वीज ग्राहकांशी संवाद साधत आहेत. त्याला प्रतिसाद देत गेल्या महिनाभरात 15 मार्चपर्यंत चार लाख एक हजार 700 थकबाकीदारांनी 479 कोटी 64 लाख रुपयांचे थकीत वीजबिल भरले आहे. यामध्ये सर्वाधिक 3 लाख 52 हजार 380 घरगुती ग्राहकांनी 303 कोटी 37 लाख, 41 हजार 620 वाणिज्यिक ग्राहकांनी 120 कोटी 40 लाख, तर 7 हजार 660 औद्योगिक ग्राहकांनी 55 कोटी 56 लाखांची थकबाकी भरली आहे. थकबाकीदारांनी बीले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
80 हजार 591 जणांचा वीजपुरवठा खंडित
आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील 80 हजार 591 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुण्यातील 54 हजार 34, कोल्हापुरातील 4 हजार 341, सांगलीतील 4 हजार 342, सोलापुरातील 8 हजार 138 व सातारा जिह्यातील 9 हजार 736 थकबाकीदारांचा समावेश आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये थकीत रक्कम न भरता आजूबाजूच्या मीटरमधून तसेच अन्यप्रकारे परस्पर वीजपुरवठा घेतल्यास वीजचोरीची कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
अजूनही 1 हजार 384 कोटी 57 लाखांची थकबाकी
अजूनही घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे एक हजार 384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात ग्राहक) पुणे जिह्यातील 10 लाख 75 हजार 626 ग्राहकांकडे 738 कोटी 13 लाख, सातारा जिह्यातील 2 लाख 13 हजार 285 ग्राहकांकडे 75 कोटी 33 लाख, सोलापुरातील 3 लाख 40 हजार 218 ग्राहकांकडे 178 कोटी 65, सांगलीतील 2 लाख 79 हजार 340 ग्राहकांकडे 136 कोटी 47 लाख आणि कोल्हापूर जिह्यातील 4 लाख 62 हजार 225 ग्राहकांकडे 255 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे.


























































