‘अडाणी’पणे केलेल्या वीज दरवाढीचा  पर्दाफाश दोन महिने उशिरा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अदानी इलेक्ट्रिसिटीने ऐन ऑक्टोबर हिटमध्येच उपनगरातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात भरमसाट वाढ करून दरवाढीचे चटके दिले होते. या अवाच्या सवा वीज दरवाढीचा पर्दाफाश होण्यास आणखी दोन महिने लागणार आहेत. वीज नियामक आयोगाने नेमलेल्या सत्यशोधन समितीला 31 मार्चची डेडलाइन दिली होती, मात्र समितीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

उपनगरातील वीज ग्राहकांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत नेहमीच्या वीज बिलाच्या तुलनेत सुमारे दुप्पट बिले पाठवली होती. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले होते. त्याची दखल घेत वीज नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कारभाराची आणि दरवाढीची चौकशी करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी माजी सनदी अधिकारी अजितकुमार जैन आणि वीज आयोगाचे माजी सदस्य विजय सोनावणे यांची समिती नेमली होती. त्यांना 31 मार्चअखेर चौकशी अहवाल देण्याची मुदत होती, पण वीज दरवाढीबाबतची अनेक कागदपत्र तपासावी लागणार आहेत तसेच ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची खातरजमा केली जाणार आहे. त्यासाठी समितीने मुदतवाढ मागितली होती. वीज आयोगाने मेअखेरची डेडलाइन दिली आहे.

समितीमध्ये आणखी एका सदस्याची भर

वीज आयोगाने सत्यशोधन समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देतानाच समितीमध्ये आणखी एका सदस्याचा समावेश केला आहे. महावितरणचे माजी मुख्य अभियंता सतीश बापट यांची तांत्रिक सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.