
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
येत्या 1 एप्रिल रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमिसॅटचे प्रक्षेपण करणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक ‘एमिसॅट’ उपग्रहाची निर्मिती केली आहे. हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह महत्वपूर्ण ठरणार असून एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, शत्रूच्या प्रदेशातील संवादाची आणि प्रदेशाचा डाटा (माहिती) मिळविणे शक्य होणार आहे.
युद्धकाळात ‘एमिसॅट’ हा उपग्रह महत्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती कम्युनिकेशन उपकरणे सुरू आहेत याची इत्थंभूत माहिती मिळेल असे डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ रकी गुप्ता यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
‘एमिसॅट’चे वजन 436 किलो आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेकता येणार आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा सध्या ड्रोन, एअरोस्टॅट आणि फुग्यांच्या माध्यमातून शत्रूंची शस्त्रास्त्र आणि हालचालींवर लक्ष ठेवतात, पण त्याला अनेक मर्यादा आहेत. ड्रोन (मानवविरहीत विमाने) काही तास उड्डाण करू शकतात, तर हेलियम गॅस असेपर्यंतच फुगा उडू शकतो, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइटचे फायदे
इलेक्ट्रॉनिक ‘एमिसॅट’मुळे त्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संकाद उपकरणे सक्रिय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. गेल्या महिन्यात हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये टेक्निकल इंटेलिजन्सची भूमिका महत्वाची होती. ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर किती दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा पुरावा मागितला तेव्हा एनटीआरओने तिथे सुमारे 300 मोबाईल सुरू असल्याची माहिती दिली होती. टेक्निकल इंटेलिजन्समुळे ही माहिती देणे शक्य झाले.
इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइट अत्यंत अत्याधुनिक असणार आहे. दुसऱ्यांचा मेसेज ‘डिकोड’ करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. आता दोन युझर्समध्ये काय संवाद झाला त्याचा अर्थ सुरक्षा यंत्रणांना समजून घेता येणे शक्य होईल.
एमिसॅटच्या आधी ‘इस्रो’ने 24 जानेवारीला डीआरडीओचा ‘मायक्रोसॅट-आर’ उपग्रह प्रक्षेपित केला आहे. रात्रीच्या वेळीही फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे.
इस्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानचे सध्या 47 उपग्रह कार्यरत आहेत. त्यातील सात ते आठ उपग्रह खास लष्करी उपयोगासाठी टेहळणीसाठी त्यांचा वापर सुरू आहे.
























































