Omicron Lockdown Mumbai – महिनाअखेर राज्य निर्बंधमुक्त, मात्र मास्कमुक्ती नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईपासून नागपूरपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणचे निर्बध हळूहळू शिथिल झाले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज  दै. ‘सामना’शी बोलताना दिले. राज्य निर्बंधमुक्त झाले तरी इतक्यात मास्कमुक्त होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निर्बंधमुक्त कधी होणार असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना केला तेव्हा ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवेळी आढावा घेऊन निर्बंध शिथिल करीत आहेत. आता तर राज्य बऱ्यापैकी निर्बंधमुक्त होत आहे. मुंबई-ठाण्यातील रेस्टाँरंटवरील निर्बंध पूर्णपणे मोकळे केले आहेत. नवी मुंबईचाही प्रस्ताव आहे. पण मध्यंतरी तेथे रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे निर्बंध शिथिल करताना काही अडचणी येणार आहेत. पण तरीही पुढील आठवडय़ात राज्यातील निर्बंध बऱयापैकी शिथिल होतील. रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्य निर्बंधमुक्त केले तरी मास्कमुक्त होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.