5 हजाराची लाच घेतांना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, हिंगोली

येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या सर्व शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंत्यांनी शाळेच्या झालेल्या बांधकामावर देखरेख ठेऊन तयार केलेल्या मोजमाप पुस्तिकेवर व काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्रावर सही देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 4 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी येथील पंचायत समिती विभागातील तक्रारदार कनिष्ठ अभियंता यांनी जिल्हा परिषद शाळेच्या झालेल्या बांधकामावर देखरेख ठेऊन तयार केलेल्या मोजमाप पुस्तिकेवर व काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्रावर सही देण्यासाठी हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानाचे कंत्राटी कार्यकारी अभियंता विजय राधेशाम अग्रवाल (41) याने 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाने 3 जून रोजी पडताळणी केली असता यामध्ये तथ्य असल्याचे आढळुन आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तक्रारदार कनिष्ठ अभियंता हा कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असून त्यांनी केलेल्या कामावर देखरेख ठेऊन तयार केलेल्या मोजमाप पुस्तिकेवर व काम पुर्णत्वाच्या दाखल्यावर सही देण्यासाठी तक्रारदाराला 5 हजार रुपयांची लाच मागितली.

4 जून रोजी हिंगोली येथील जिल्हा परिषदेमध्ये एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता विजय राधेशाम अग्रवाल यांना 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या फिर्यादीवरून आरोपी विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील यांच्यासह अभिमन्यु कादें यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.