
इंग्लंडला वन डे क्रिकेटमध्ये जगज्जेते बनविणारा कर्णधार इयॉन मॉर्गनने सर्वच प्रकारच्या क्रिकेटला गुडबाय केला. सोमवारी सोशल मीडियावर त्याने याबाबतची अधिकृत घोषणा केली. मॉर्गनने गतवर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आज त्याने लीग क्रिकेटलाही पूर्णविराम दिलाय.
सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजमध्ये इयॉन मॉर्गनने लिहिले की, ‘मी समाधानी मनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आता निवृत्ती घेत आहे. ज्या क्रिकेटने मला जीवनात भरपूर काही दिले, त्या खेळातून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याची जाणीव मला झाली. या खेळामुळे मला जगभर भ्रमंती करता आली, वेगवेगळय़ा लोकांना भेटण्याची संधी मिळाली, काही चांगले मित्रही जोडले गेले. फ्रेंचाईजी क्रिकेटचाही मनमुराद आनंद घेतला. हे सर्व मंतरलेले क्षण मी सदैव जपून ठेवेन. आता कुटुंबीय आणि जवळच्या लोकांमध्ये उर्वरित आयुष्य घालवेन. क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी समालोचक किंवा क्रिकेटतज्ञ म्हणून या खेळाशी जोडून राहण्याची मी प्रयत्न करीन.’



























































