फ्लॅट बुकिंगचे पैसे घेतले नसले तरी विकासकाला परतावा करावा लागेल; पार्टनरला हायकोर्टाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या प्रकल्पाचा विकास दोन पार्टनर करत असतील तर दोघांनाही फ्लॅट बुकिंगचे पैसे परत करावे लागतील. माझ्याकडे फ्लॅट बुकिंगचे पैसे जमा करण्यात आले नाही. त्यामुळे मी पैसे परत करणार नाही, असा दावा पार्टनर करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

फ्लॅट बुकिंगचे पैसे न घेणाऱया प्रमोटरला व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात का, असा मुद्दा न्यायालयासमोर सुनावणीसाठी होता. न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने यावर निकाल देताना वरील निर्वाळा दिला. त्यामुळे बुकिंगचे पैसे न घेणाऱया विकासकालाही परतावा करावा लागणार आहे. या निकालाने पैसे परत न देणाऱया विकासक पार्टनरला चांगलाच दणका बसला आहे.

काय आहे प्रकरण…
अंधेरी येथील एका प्रकल्पात विजय चौक्सी यांनी फ्लॅट बुक केला. हा प्रकल्प वाधवा कंपनी व एसएसएस एसकाटीक कंपनी करत होती. चौक्सी यांनी घराचे आगाऊ पैसे दिले. वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याने विजय यांनी बुकिंग पैसे परत मिळवण्यासाठी रेराकडे अर्ज केला. रेराने दोन्ही विकासक कंपन्यांना चौक्सी यांना बुकिंगचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. याविरोधात वाधवा कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

वाधवा कंपनीचा दावा
चौक्सी यांचे बुकिंगचे पैसे मी घेतले नाहीत. त्यामुळे पैसे परत करण्याची जबाबदारी माझी नाही. जर मी बुकिंगचे पैसे घेतले असते तर पैसे परत करण्याची जबाबदारी माझी आहे, असा दावा वाधवा कंपनीकडून करण्यात आला.

न्यायालयाचे निरीक्षण
कायद्यात प्रमोटरची व्याख्या करण्यात आली आहे. वाधवा कंपनी प्रकल्पाची प्रमोटर आहे. त्यांनी बुकिंगचे पैसे घेतले नसले तरी ते प्रमोटर आहेत. त्यामुळे बुकिंगचे पैसे व्याजासह परत करण्याची जबाबदारी वाधवा कंपनीचीदेखील आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.