चिक्कीत खाण्याच्या रंगाचं प्रमाण तिप्पट, मगनलाल चिक्कीला पाच लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

लोणावळ्याच्या प्रसिद्ध मगनलाल चिक्की उत्पादक कंपनीला अन्न आणि औषध प्रशासनाने(एफडीए) चांगलाच दणका दिला आहे. चिक्कीमध्ये खाण्याचा रंग आवश्यकतेपेक्षा जास्त आढळल्यामुळे कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वीच चिक्कीच्या दर्जावरून अन्न आणि औषध प्रशासनाने मगनलाल चिक्की कंपनीला पुढील मालाचं उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता चिक्कीत खाण्याच्या रंगाचं प्रमाण तिप्पट आढळलं आहे. हे अन्न सुरक्षा कायदा 2006चं उल्लंघन असून त्यासाठी रुपये पाच लाख इतक्या दंडाची शिक्षा आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यान्वये, प्रत्येक खाद्यपदार्थात वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांचं प्रमाण निश्चित केलेलं असतं. चिक्कीमध्ये प्रतिकिलो 100 मिलिग्रॅम इतकाच खाण्याचा कृत्रिम रंग वापरता येतो. मात्र, मगनलाल यांच्याकडील स्ट्रॉबेरी-शेंगदाणा चिक्कीत हेच प्रमाण प्रतिकिलो 306.55 मिलिग्रॅम इतकं आढळलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यावर मगनलाल चिक्कीचे मालक अशोक अगरवाल यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडील खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे जिन्नस हे नेहमीच दर्जेदार असतात. मात्र, चिक्की बनवणाऱ्या कामगारांनी चिक्कीच्या फिकट रंगामुळे अधिकच्या रंगाचा वापर केला असावा. पण आता हे रंग वापरणं कायमचं बंद करणार असल्याची माहिती अगरवाल यांनी दिली आहे.