
माथाडी संघटनेची पावती फाडावी लागेल अन्यथा डागडुजीचे काम करू देणार नाही, अशी दमदाटी करत दोघा डॉक्टरांकडे खंडणी मागणाऱया खार दांडय़ातील एका भामटय़ाला माटुंगा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. स्वतःला माथाडीचा नेता असल्याचे सांगत, त्या भामटय़ाने एका डॉक्टरकडून 40 हजार रुपये उकळले होते.
माटुंगा पूर्वेकडील भांडरकर मार्गावर डॉ. लवंडे यांचे क्लिनिक आहे. त्यांनी क्लिनिकच्या डागडुजीचे काम सुरू केले होते. दरम्यान एक व्यक्ती त्या ठिकाणी गेला व तेथे काम करणाऱयांना डॉक्टरांशी संपर्क साधण्यास भाग पाडून माथाडी संघटनेची 57 हजार रुपयांची पावती फाडावी लागेल, असे म्हणाला. तसेच माथाडी नेता संतोष पाटील याने डॉक्टरांचा नंबर मागितल्याचे सांगून तो कामगारांकडून डॉक्टरांचा नंबर घेऊन गेला. त्यानंतर त्याने स्वतः डॉ. लवंदे यांना संपर्क साधला व आपण संतोष पाटील म्हणत असल्याचे सांगितले. पावती न फाडल्यास काम बंद पाडू असे त्याने धमकावले. त्यामुळे भीतीपोटी डॉ. लवंदे यांनी त्याला 40 हजार रुपये दिले. एक डॉक्टर फसल्यानंतर आरोपीची हिंमत वाढली. दरम्यान त्याच परिसरातील मॅकान्सी इमारतीत डॉ. गोयल यांचे क्लिनिक असून त्या क्लिनिकचेदेखील डागडुजीचे काम सुरू असल्याचे आरोपीला समजले. मग त्याने डॉ. गोयल यांना संपर्क साधून आपण माथाडी नेता संतोष पाटील बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला क्लिनिकच्या डागडुजीचे काम करायचे असेल, तर 50 हजारांची पावती फाडावी लागेल अन्यथा काम बंद पाडू असे धमकावले. मात्र डॉ. गोयल यांनी त्याच्या धमकीला भीक न घालता थेट माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पगार, उपनिरीक्षक विनोद पाटील तसेच सुर्वे, मंगेश जर्हाड, मुंडे, मेटकरी, देशमाने या पथकाने तपास सुरू केला.
भामटा प्रेयसीसोबत सापडला
पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा स्वतःला माथाडी नेता संतोष पाटील असे सांगणाऱया आरोपीचे नाव मोबीन मोहम्मद शेख (22) असे असून तो त्याच्या चेंबूर येथे राहणाऱया प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पगार व पथकाने चेंबूर कॉलनीत जाऊन मोबीनच्या गठडय़ा वळल्या. तसेच त्याच्यासोबत दुचाकी घेऊन फिरणारा व त्याच्या प्रेयसीचा आतेभाऊ कुणाल सिंग यालादेखील अटक केली. मोबीन विरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यातदेखील फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
























































