पावसाळ्यात सखल भागांतील पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंपांचा वापर, पालिकेवर 10.15 कोटींचा वाढीव बोजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-rains-heavy-rainfall-lashes-city-orange-alert-till-july-5-local-trains-delayed-waterlogging-updates

पावसाळ्यात मुंबईतील सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या उदंचन संचांवर मुंबई महापालिकेचा वाढीव खर्च झाला आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे 2024 आणि 2025 या दोन वर्षांत ठिकठिकाणी अतिरिक्त पंप बसवण्यात आल्याने पालिकेच्या मूळ कंत्राट खर्चात सुमारे 10 कोटी 15 लाख रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीव खर्चासह सुधारित कंत्राट रकमेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईत सखल भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून पालिका गेल्या 14 वर्षांपासून भाडेतत्त्वावर हाय-कॅपॅसिटीचे उदंचन संच लावून पाणी जवळच्या नाले किंवा मलनिःसारण वाहिन्यांत उपसण्याचे काम करत आहे. प्रशासक तथा पालिका आयुक्तांनी 9 मे 2024 रोजी ठराव मंजूर करून 2024 व 2025 या दोन वर्षांच्या पावसाळ्यासाठी विविध सखल ठिकाणी 481 उदंचन संच भाडेतत्त्वावर बसवण्यास आणि त्यांच्या देखभालीस मंजुरी दिली होती. यासाठी मूळ कंत्राट रक्कम 121 कोटी 80 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती.

अतिरिक्त पंपांची मागणी

आपत्कालीन गरजेनुसार कंत्राटदाराकडून मंजूर दरांवर 25 टक्के अतिरिक्त पंप घेण्याची तरतूद मूळ मंजुरीत करण्यात आली होती. त्यानुसार, 2024च्या पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या अतिरिक्त 46 ठिकाणी आणि 2025च्या पावसाळ्यात तब्बल 80 ठिकाणी संबंधित प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी वाढीव पंपांची मागणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने कुर्ला, चेंबूर, अंधेरी, दादर, परळ, घाटकोपर, कांदिवली, मालाड आणि बोरिवली यांसारख्या सखल व पूरप्रवण भागांचा समावेश होता. स्थानिक गरजेनुसार कंत्राटदारांमार्फत हे वाढीव पंप तातडीने कार्यान्वित करण्यात आले.

131 कोटींचे सुधारित कंत्राट

अतिरिक्त पंपांच्या वापरामुळे मूळ कंत्राट रकमेवर केवळ 8.34 टक्के अतिरिक्त खर्च झाला आहे. कंत्राटातील अटींनुसार आवश्यक फेरफार व वजावट केल्यानंतर पालिकेला 10 कोटी 15 लाख 60 हजार 734 रुपयांचा वाढीव खर्च आला आहे. परिणामी, या कामाचे एकूण सुधारित कंत्राट मूल्य आता सुमारे 132 कोटी रुपये एवढे झाले आहे.