
नागरिकांनो तुम्ही जर फेसबुकवर ‘कपल चँलेज’च्या नावाखाली छायाचित्र अपलोड करीत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या छायाचित्र मॉर्फ होण्याची शक्यता असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
फेसबुकवर मागील काही दिवसांपासून कपल चँलेजच्या नावाखाली दाम्पत्यांकडून छायाचित्रे अपलोड केली जात आहेत. त्यामध्ये उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिक पत्नीसोबतचे छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक ट्विट करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागेल. त्याशिवाय फसवणुकीची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशारा पोलिसांनी ट्विटद्वारे दिला आहे.
सायबर गुन्हेगारांनी यापूर्वी सोशल मीडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानाही अनेकांकडून कोणताही विचार न करता बिनधिक्कपणे छायाचित्रे प्रसारित केले जात आहेत. महिलांच्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाईटवर अपलोड केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनेकांना कौटुंबिक तणावाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा प्रकारची छायाचित्रे प्रसारित करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकतर्फी प्रेमातून सायबर गुन्हेगारांनी महिलांसह तरुणींच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी अश्लील छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
नागरिकांकडून सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो अपलोड केल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यापुर्वी अशा घटना घडल्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. दररोजच्या वेगवेगळ्या चॅलेंजमुळे सायबर चोरट्यांकडून छायाचित्रांचा वापर मॉर्फ करण्यासाठी केला जाउ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक फोटो शेअर करु नये. – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, सायबर विभाग
























































