
सामना प्रतिनिधी । जामखेड
आठवडे बाजारासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने तिघा अज्ञात ठगांनी बनावट सोन्याचे बिस्किटे देऊन वृद्धेकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना जामखेड तालुक्यातील खर्डा गावात घडली. या प्रकरणी जामखेड पोलिसांत वृद्धेच्या फिर्यादीवरून तिघा ठगांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने खर्डा परिसरात खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील पांढरेवाडी येथील वयोवृद्ध महिला कमलाबाई सुदाम गिते (वय 65) ह्या गुरुवारी 6 रोजी आठवडे बाजार करण्यासाठी खर्डा गावात आल्या होत्या. त्या बाजार करून खर्डा गावातील वेशीजवळ येऊन थांबल्या होत्या. यावेळी तीन अज्ञात ठगांनी त्यांना आमच्याकडे सोन्याचे बिस्कीटे आहे ते तुम्ही घ्या, स्वस्तात देऊ, आम्हाला पैशांची गरज आहे अशी बतावणी केली. यावेळी वृद्धेने माझ्याकडे रोख पैसे नाहीत मला तुमचे सोने नको असे सांगितले. दरम्यान सावज हातचं जाऊ नये म्हणून तिघा ठगांनी तुमच्या जवळील सोने आम्हाला द्या व बिस्किटे तुम्हाला घ्या असा प्रस्ताव दिला. वृद्ध महिलेने या प्रस्तावाला होकार दिला असता ठगांनी त्या वृद्धेला दगडी चाळ भागात चला आम्ही तेथे तुम्हाला सोन्याचे बिस्कीटे देतो असे सांगितले.
तिघा ठगांसमवेत वृद्ध महिला दगडी चाळ भागात गेली. तिथे या महिलेने गळ्यातील सोन्याची बोरमाळ, बदाम पत्ते, कानातील कर्णफुले असे तीन तोळे सोने देऊन ठगांकडून सोन्याचे नकली बिस्किटे घेतले. वृद्धेकडील सोने घेऊन तिघे ठग पसार झाल्यानंतर ती महिला गावात आली. आपल्याकडे असलेल्या सोन्याच्या बिस्कीटाची खात्री करू लागली मात्र सदरचे बिस्कीट सोन्याचे नसून पितळाचे असल्याचे महीलेचा मुलगा बिभीषण भेटल्यानंतर खात्री झाली.
पितळाचे बिस्किटे सोन्याचे असल्याचे भासवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने जामखेड पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार कथन केला. दरम्यान घटना घडून बराच काळ लोटल्यामुळे आरोपींचा शोध लागू शकला नाही. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिसांत तिघा चोरट्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यात मागील वर्षी सोन्याच्या आमिषापोटी एका डॉक्टराला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच नान्नज परिसरातही लुटीच्या घटना घडल्या होत्या. वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटनेत मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे.


























































