अर्धवट कर्जमाफीमुळे आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

अर्धवट कर्जमाफीमुळे उमरी तालुक्यातील तुराटी गावचे 60 वर्षीय शेतकरी पोतन्ना बलपीलवाड हे बळी ठरले आहेत. सरसकट कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. म्हणून सरकारने आतातरी ठोस पावले उचलून सरसकट कर्जमाफी करावी जेणेकरून आणखी कुण्या शेतकऱ्यांना जीवन संपवण्याची दुर्दैवी वेळ येणार नाही, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष किसनराव कदम यांनी मयत शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली, परिस्थिती जाणून घेतली. सरकारच्या कोणत्याही योजनेवर सामान्य शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. पोतन्ना बलपीलवाड यांचे कर्जमाफीच्या तीन-चार यादीतही नाव आले नाही. शेतात सतत नापिकी आहे त्या पिकाला भाव नाही. दिवाळीला आलेल्या 5 मुली, नातवंड यांचा दिवाळी बाजार कसा करावा या विचाराने अस्वस्थ झालेल्या त्याने जाचक अटी न ठेवता कर्जमाफी झाली असती तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचले असते. तुम्हा-आम्हाला कल्पना करणंही शक्य होणार नाही, पण कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे पोतन्नांनी शेतात स्वत:चे सरण रचलं आणि आग लावून उडी घेतली. स्टेट बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँकेचे तीन लाखांच्या कर्जाने अस्वस्थ बापाला दिवाळीला आलेल्या मुलींना नातवंडाला कपडे घेता येत नाहीत ही सल सतत मनाला बोचत राहिल्याने स्वत:ला अग्नीत सामावून घेण्याची वेळ पोतन्नांवर आली, असं ते म्हणाले.

कर्जामुळे शेतकरी मरत असतील तर मग 34 हजार कोटींचं कुणाचं कर्ज माफ झालं हा मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर राज्यातील शेतकरी मागत आहेत.