पाऊस येईना… दुष्काळाच्या भीतीने शेतकरी भयभीत

40

सामना ऑनलाईन | साक्री

या वर्षी साक्री तालुक्यात सुमारे एक महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली. बऱयापैकी पाऊस झाल्यामुळे शेतकऱयांनी पेरणीच्या कामास सुरुवात केली जवळपास 50 टक्के पेरणी आटोपली आहे. अजूनही मोठय़ा प्रमाणावर पेरणी बाकी असून 15 जुलै आटोपल्यावर हीदेखील पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे या वर्षीही दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱयांच्या समोर असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. काही ठिकाणी मका, भुईमूग पेरणी झालेल्या पिकांचे अंकुर फुटायला लागलेत. दरम्यान, जंगलात खाण्यापिण्यास काही नसल्यामुळे चिमणी पाखरांनी व खारूताईने शेतातील भुईमूग, मका, सोयाबीन सारख्या अंकुर फुटलेल्या पिकांवर ताव मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.

 गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई

तालुक्यातील सर्वच जलाशय गेल्या वर्षी जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेले होते. सद्यस्थितीत त्या जलाशयांमध्ये फक्त मृत साठा शिल्लक आहे . सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने तालुक्यातील सर्वच गावांमधल्या पाणीपुरवठा करणाऱया विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पेरण्या खोळंबल्या

तालुक्यातील पश्चिम पट्टय़ामध्ये आजही पेरणी सुरू झालेली नाही. प्रामुख्याने नागली भात व सोयाबीन या पिकांची लागवड करण्यात येते. नागली व भात पिकाची रोपे तयार असून इथला शेतकरी लागवडीसाठी पावसाची वाट बघत बसला आहे. येत्या आठवडय़ात पाऊस झाल्यास नागली आणि भाताची लागवड होऊ शकेल, अन्यथा ही रोपे उद्ध्वस्त होतील आणि या परिसरातला खरीप हंगाम गेल्यात जमा होईल. माळ माथा परिसरात प्रामुख्याने कांदा पिकाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.  इथे कांद्याची रोपे तयार आहेत, मात्र विहिरींना पाणी नसल्यामुळे कांदा लागवड अद्यापही झालेली नाही. पांझरा कान नदी किनारपट्टी परिसरात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या साधारण पावसामुळे येथील शेतकऱयांनी बऱयाच प्रमाणावर पेरणी केलेली आहे. परंतु मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पेरलेले पिकांचे अंकुर वळायला लागले असून या परिसरात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे. आज इथला शेतकरी अतिशय हलाखीचे जीवन जगत असताना त्यांना दुबार पेरणी करणे शक्य होणार नाही.

भाजीपालाच्या बाजारपेठा ओस पडल्या

पाऊस नसल्यामुळे पिकांची अवस्था बिकट असून शेतशिवारात मजुरांना काम नाही. परिणामी हातात पैसा नाही. म्हणून तालुक्यातील साक्री, निजामपुर, पिंपळनेर, म्हसदी, कासारे, दहिवेल, जैताने येथील आठवडे बाजारात परिणाम झालेला दिसून येत आहे. ग्राहक नसल्यामुळे भाजीपाल्याला मागणी नाही. परिणामी काटकसरीचे पाणी वापरून मोजक्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन करणाऱया शेतकऱयांना योग्य तो मोबदला मिळत नाही. यामुळे किरकोळ भाजीपाला व्यापारी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

जनावरांसाठी चारा छावणी गरजेची

साक्री तालुक्यात गेल्या वर्षीही एक मंडळ वगळता सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्या दुष्काळाची झळ सहन करीत असलेल्या शेतकऱयांना या वर्षीही दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या वर्षीचा दुष्काळ इतका भयानक आहे की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असा दुष्काळ या तालुक्याने कधी पाहिलेला नव्हता. कदाचित मागे जे काही दुष्काळ पडलेले असतील त्या दुष्काळामध्ये किमान पिण्याचे पाणी तरी उपलब्ध होते. शेतकरी जमिनीत असलेल्या पाण्यावरून आपली बागायती शेती करून कशी तरी उपजीविका भागवत होता, मात्र या वर्षी तालुक्यात कुठल्याही गावांमध्ये विहिरींना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी जनावरांसाठी चाराही उपलब्ध करू शकत नाही. चाराच नसल्यामुळे जनावरांना चाऱयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात शासनाने त्वरित चारा छावण्या उभाराव्या आणि शेतकऱयांचे पशुधन वाचवावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या