
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशमधील हट्टा डूंडासिवनी गावात वडिलांना बाहेर काढण्यासाठी दोन मुली विहिरीत उतरल्या. मात्र विहिरीतील विषारी गॅसमुळे या तिघांचा मृत्यू झाला आहे. गणेश राऊत (५०), बबिता (२२), सविता(१९) अशी मृतांची नावे आहेत.
सोमवारी सकाळी शेतात धान्य पेरण्यासाठी गणेश आपल्या बबिता व सविता या दोन मुलींना घेऊन शेतात गेला होता. दुपारी १२ वाजता जेवण झाल्यानंतर गणेश आपल्या साथीदारांसह पाणी घेण्यासाठी विहिरीवर गेला. पण दोर नसल्यामुळे त्यांनी एका भांड्याभोवती तार बांधली व ते भांडे विहीरीत सोडले. पण दोर वर खेचत असतानाच भांडे विहीरीत पडले. यामुळे भांडे काढण्यासाठी गणेश विहिरीत उतरला. पण आतील विषारी गॅसमुळे तो बेशुद्ध पडला. हे पाहताच त्यांच्या साथीदारांनी तिथून पळ काढला.
बबिता व सविताला याबद्दल कळताच त्यांनी विहीरीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर वडिलांना बाहेर काढण्यासाठी बबिता विहिरीत उतरली. पण बराच वेळ झाला तरी ती परतली नाही. यामुळे सविता विहिरीत उतरली. मात्र विषारी गॅसमुळे गुदमरून या तिघांचा मृत्यू झाला.
























































