फिफा विश्वचषकादरम्यान 400 ते 500 कामगारांचा मृत्यू, कतारच्या अधिकाऱ्याने केला खुलासा

कतारमध्ये सुरु असलेला फिफा विश्वकप पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कतार सरकारने सांगितले आहे की फिफा विश्वचषक 2022 साठी स्टेडियम तयार करण्यासाठी 30,000 परदेशी कामगारांना काम देण्यात आले होते. कतारच्या एका अधिकाऱ्याने नुकत्याच एका मुलाखतीत संपूर्ण तयारी दरम्यान 400 ते 500 कामगारांना मृत्यू झाल्याचा खुलासा केला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

फिफा विश्वचषकासाठी अनेक वर्षांपासून तयारी सुरु होती. 200 डॉलरहून अधिक असलेले स्टेडिअम, मेट्रोलाइन आणि टुर्नामेण्टसाठी आवश्यक मुलभूत सुविधेसाठी हजारो संख्येने कामगारांना कामाला लावण्यात आले होते. अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, या कामादरम्यान शेकडो कामगारांचा मृत्यू झाला. मीडिया वृत्तानुसार, विश्वचषकाच्या तयारी दरम्यान हजारोंच्या संख्येने कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. या वृत्तानंतर जगभरातून कतारवर टीका करण्यात आली. मात्र आता याबाबत नवा खुलासा समोर आला आहे. फीफा विश्वचषक 2022 च्या तयारी दरम्यान नेमका किती लोकांचा मृत्यू झाला आहे याचा आकडा सांगण्यात आला आहे. हा खुलासा खुद्द फिफा विश्वचषकाच्या संबंधित कतारचे उच्च अधिकारी हसन अल-थावाडी यांनी केला आहे.

हसन हे कतारच्या ‘डिलिव्हरी आणि लीगेसी या सर्वोच्च समितीचे महासचिव आहेत. त्यांनी ब्रिटीश पत्रकार पियर्स मोर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत फिफा विश्वचषकाच्या तयारी दरम्यान 400 ते 500 कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पियर्सने या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर सर्वोच्च समिती आणि कतार सरकारने याप्रकरणी मौन राखले आहे. ब्रिटीश पत्रकार पियर्स मोर्गन यांनी मुलाखतीत हसन यांना विचारले ‘विश्वचषकाशी संबंधित कामामुळे स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूबाबत प्रामाणिक, वास्तववादी आकडेवारी काय आहे? त्यावर उत्तर देताना हसन म्हणाले 400 ते 500 दरम्यान हा आकडा आहे. मात्र तो अचूक आकडा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कतार सरकारच्या माहितीनुसार, 2010 आणि 2019 दरम्यान देशात जवळपास 15,021 प्रवाशांचा मृत्यू झाला. द गार्डियनच्या वृत्तानुसार, जेव्हापासून कतारला फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे तेव्हापासून 2021 पर्यंत तिथे 6500 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व हिंदुस्थान, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका येथील होते. तसे सरकारने स्थान, काम किंवा इतर घटकांनुसार मृत्यूचे विभाजन केले नाही. कतार सरकारने हेही सांगितले की, फिफा विश्वचषक स्टेडियम बनविण्यासाठी 30000 विदेशी कामगारांना कामाला लावण्यात आले होते. या सर्व व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला (ILO) 2020 मध्ये कामाच्या दरम्यान 50 लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळले. 500 गंभीर जखमी झाले आणि 37,600 लोकांना सौम्य ते मध्यम जखमा झाल्या.