
आमदार नितेश राणे हे नगर दौऱ्यावर आले असता शहरातील कापड बाजार येथे त्यांनी चौक सभा घेतली. या चौक सभेदरम्यान मनपा आयुक्त पंकज जावळे यांना भाषणाच्या माध्यमातून शिवीगाळ केली. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्याची मागणी आज बुधवारी नगर महापालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक यादव यांना दिले. यावेळी कृती समितीच्या सर्व सदस्यांनी मनपा आयुक्त जावळे यांची भेट घेऊन त्यांना सभेदरम्यान जे अपमानित शब्द वापरले त्याबद्दल कृती समितीने त्यांना या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून कृती समिती आपल्या पाठीशी आहे. पुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सांगितले.
बाहेरील आमदाराने शहरात येऊन आयुक्तांबद्दल जे वक्तव्य केले त्याचा यावेळी निषेध करण्यात आला तसेच कृती समितीमार्फत मनपा आयुक्त कार्यालयातून कोतवाली पोलीस स्थानकात येऊन कृती समितीने कोतवाली पोलीस निरीक्षक यादव यांची भेट घेऊन झालेला प्रकार हा निंदनीय आहे. आयुक्तांना जातीयवादी शब्द वापरल्याबद्दल ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी चर्चा झाली.
यावेळी कृती समितीचे अनिल शेकटकर यांनी सांगितले की, नगर शहरात भर चौकात आयुक्तांबद्दल जे अपशब्द आणि जातीय वाचक हिन शब्द वापरून शिवीगाळ केली त्याबद्दल आम्ही नगर कर्मचारी कृती समितीच्या वतीने निषेध नोंदवत आहोत तसेच भगवान जगताप यांनी सांगितले की, हा प्रकार नगर शहराची शांतता भंग करण्याचा प्रकार आहे. दंगल घडवून आणणारी ही घटना असू यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणारी ही निंदनीय गोष्ट आहे. प्रशासनाचा अधिकारी या नात्याने सर्वांचा विचार करून त्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना अपमानित वागणूक देण्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे सांगण्यात आले.
सुनिता चव्हाण यांनी सांगितले की, नगर शहरात आयुक्तांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. असे असूनही त्यांच्याविषयी अरेरावीची भाषा करणे, म्हणजे नगर शहराच्या चाललेल्या चांगल्या कारभारामध्ये व्यत्यय आणण्यासारखे आहे. यावेळी कांतीलाल जावळे, विनोद घोरपडे, गणेश शेकटकर, गणेश पठारे, सुनिता चॊव्हाण, लखन गाडे, शरद भालेराव आदी उपस्थित होते.

























































