
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील भर मध्यवस्तीतील कै. बाबा नजू राहिंज विविध सहकारी सेवा संस्थेच्या चार मजली इमारतीला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत इमारतीतील नगर अर्बन बँकेच्या शाखेसह, होलसेल किराणा दुकान व एस. डी. फिटनेस सेंटर जळून खाक झाले. आगीमुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
कै. बाबा नजू राहिंज संस्थेच्या इमारतीत पोपटशेठ मुनोत या नावाने मोठे होलसेल किराणा दुकान आहे. रविवारी (दि. 10) मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर या दुकानाचे मालक राजेंद्र मुनोत, संजय मुनोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने रौद्ररूप धारण केलेले असल्याने मुनोत यांनी नागवडे कारखाना, श्रीगोंदा नगरपालिका, दौंड नगरपालिका, कुरकुंभ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे बंब बोलावले. अग्निशमन दलाने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. आगीत मुनोत यांच्या तळघर व पहिल्या मजल्यावरील किराणा दुकानातील तेल, तुपडबे, गुळ, डाळींसह अनेक किराणा वस्तू जळून खाक झाल्या. ही आग वरच्या मजल्यांवर पोहोचून नगर अर्बन बँकेचे फर्निचर, कागदपत्रे, इन्हर्वटर व बँकेच्या लॉकरला आगीची झळ बसली. दोन दिवसांत खातेदारांना बोलावून पंचनामा केल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येणार आहे. तिसऱया मजल्यावरील फिटनेस सेंटरमधील व्यायामाचे साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आमदार बबनराव पाचपुते, अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, संचालक अनिल कोठारी, शैलेश मुनोत, कैलास पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, राहिंज संस्थेचे अध्यक्ष बबनराव राहिंज, उपाध्यक्ष गोरख पाचपुते, विठ्ठल काकडे, व्यवस्थापक राजेंद्र रोकडे, एम. पी. साळवे, शाखा अधिकारी श्रीकांत शेळके, बंडू जगताप, सतीश कुतवळ यांनी भेट देऊन पाहणी केली. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पोलीस पंचनामा करण्यात आला आहे.

























































