आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा कोल्हापुरात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली. याला 24 तास पूर्ण होण्यापूर्वीच आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा कोल्हापुरात दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सात कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बहुजन वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रिया किरण कांबळे-शिरगावकर (रा. गोकुळ शिरगाव), अस्लम ऐनुद्दीन मुल्ला (रा. गौरवाड, ता. शिरोळ), डॉ. अरुणा भीमराव माळी (रा. शाहू नाका परिसर), बबन पांडुरंग कावडे (रा. गंजीमाळ), प्रा. शाहीद शेख (रा. भोई गल्ली, बिंदू चौक), सुशीलकुमार बापूसाहेब कोल्हटकर (रा. सिद्धार्थनगर) आणि अनिल सुभाष म्हमाणे (रा. उमा टॉकीज चौक, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर करण्याविरोधात आज दुपारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पोलिसांचा आदेश धुडकावून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल पोलीस सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.