
देशातील पहिली स्वदेशी तेल विहीर गुजरातेतील धमासान या गावातील एका छोटय़ाशा भूखंडावर बांधण्यात आली आहे. तब्बल 1680 मीटर खोल ड्रिल करून ही विहीर बांधण्याचे आत्मनिर्भर काम मेघा इंजिनीयरिंगने (एमईआयएल) केले असून नुकतीच ही विहीर ओएनजीसीकडे सुपूर्द करण्यात आली.
‘एमईआयएल’ने अशा 47 तेल विहिरी बांधण्यासाठी तब्बल 6 हजार कोटींचे कंत्राट ओएनजीसीकडून मिळवले असून आसाम, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि तामीळनाडूत विहिरी बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष श्रीनिवास रेड्डी यांनी दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तेल आणि गॅस उत्पादनाचा वेग तर वाढतोच पण सुरक्षाही जपली जाते, असे मुख्याधिकारी एन. कृष्णकुमार यांनी सांगितले.
शिपिंग कॉर्पोरेशन खरेदी करणार
केंद्र सरकारने शिपिंग कॉर्पोरेशन ही कंपनी विकण्याचे ठरवले आहे. ही कंपनी खरेदी करण्यास एमईआयएल इच्छुक असून आम्ही निश्चित निविदा स्पर्धेत उतरू, असेही या वेळी सांगण्यात आले.




























































