कांदिवली येथून पाच बांगलादेशींना अटक 

एकाच कुटुंबातील पाच बांगलादेशी नागरिकांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. कांदिवली परिसरात काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक प्रकाश घाटगे, गावकर, दिसले, हिरेमठ, कुंभार, बेऊर आईच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी इस्लाम कंपाऊंड येथे सापळा रचला. सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने ते बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशात उपासमारी आणि बेरोजगारीमुळे मोहम्मद हबिबूर हा मुंबईत आला. तेव्हा तो कांदिवलीच्या लालजीपाडा येथे राहत होता. त्यानंतर 2009 साली त्याची फॅमिली मुंबईत आली. ते मालवणी येथे भाडय़ाने राहत होते. त्यानंतर तीन महिन्यांपासून ते पाच जण हे कांदिवलीच्या इस्लमान कंपाऊंड येथे राहण्यास आले. मोहम्मद आणि फातिमा हे बिगारी काम करतात, तर त्यांची तिन्ही मुले ही मुंबईतील विविध बांधकाम साईडवर कडियाकाम, प्लंबरचे काम करतात. पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. ते एका अॅपच्या माध्यमातून नातेवाईकांच्या संपर्कात असायचे. त्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्या पाच जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.