
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात लेप्टोचे १९ रुग्ण आढळले आहेत तर गेल्या आठवडाभरात लेप्टोने दोन बळी घेतले आहेत. त्यापैकी एकजण वरळी येथे राहणारा असून दुसरी व्यक्ती सायन-प्रतीक्षानगर परिसरात राहणारी आहे. आतापर्यंत लेप्टोने पाचजणांचा बळी घेतला आहे.
पावसाने जोर धरल्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांत काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेकांना कामानिमित्त या दूषित पाण्यातून ये-जा करावी लागते. या दूषित पाण्यातून लेप्टोने हातपाय पसरले आहेत. गेल्या आठवडाभरात मुंबईत लेप्टोने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. जून महिन्यात तीनजणांचे लेप्टोमुळे प्राण गेले. वरळी येथे राहणाऱ्या १७ वषीय मुलाचा केईएम रुग्णालयात लेप्टोमुळे जीव गेल्याचे समोर आले आले तर सायनच्या सोमय्या या खासगी रुग्णालयात एका ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पहिल्या घटनेत १७ वर्षांचा हा मुलगा वरळी सी-फेस आणि इतर परिसरात पाण्यातून चालला होता. त्यानंतर या मुलाला तीन दिवस ताप होता. पालिकेच्या रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवल्यानंतर हा मुलगा तपासणीसाठी आला नाही. सातव्या दिवशी हा मुलगा रुग्णालयात आला तेव्हा त्याची तब्येत खालावली होती.
जुलैच्या पहिल्या १५ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी
डेंग्यू – १६
मलेरिया – १९२
लेप्टोस्पायरोसिस – १९
गॅस्ट्रो – ५१९
हेपिटायटिस – ४९

























































