‘बेस्ट’ बसचा ताफा फुल होतोय, आणखी तीन हजार एसी इलेक्ट्रिक गाडय़ा येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने ‘बेस्ट’च्या बाजूने निकाल दिल्यामुळे 2100 बस घेण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच ‘बेस्ट’च्या ताफ्यात आणखी तीन हजार एसी इलेक्ट्रिक गाडय़ा घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या गाडय़ांमुळे बेस्टचा ताफा फुल होणार असून सात हजारांवर जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार असल्याची माहिती ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. या गाडय़ा इलेक्ट्रिक एकमजली असल्याने पर्यावरणपूरक राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफ लाइन असलेल्या ‘बेस्ट’च्या प्रवाशांची दररोजच्या प्रवाशांची संख्या 32 ते 35 लाखांवर गेली आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात सध्या 3228 बसेस आहेत. यातील अनेक बस त्यांची कालमर्यादा संपल्याने क्रॅबमध्ये जात असतात. या वर्षी किमान 500 बस बाद होणार आहेत. त्यामुळे बसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शिवाय ‘बेस्ट’च्या धोरणानुसार 2026 पर्यंत गाडय़ांचा एकूण ताफा दहा हजार इलेक्ट्रिक बसपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आणखी तीन हजार बस घेण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. एकमजली इलेक्ट्रिक एसी गाडय़ा भाडेतत्त्वावर चालवण्यात येणार आहेत.

सध्याची बससंख्या
वातानुकूलित इलेक्ट्रिक बस 1162
विना वातानुकूलित बसेस 2066
‘बेस्ट’ उपक्रमाच्या मालकीच्या 1646
भाडेतत्त्वावरील 1584
एकूण बस गाडय़ा 3,228

2023 अखेरपर्यंत 7 हजार गाड्या येणार
पर्यावरणस्नेही प्रवास उपक्रमांतर्गत वातानुकूलित इलेक्ट्रिक बस आणल्या जात आहे. यामध्ये ‘बेस्ट’मध्ये 2023 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात एकूण सात हजार बस आणल्या जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.