बिहार, केरळ आणि आसाममध्ये महापूर; 154 जणांचा मृत्यू

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहार, केरळ आणि आसाममध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत 154 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सवा कोटी नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकटय़ा बिहारमध्ये 66 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले असून त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 19 तुकडय़ा कार्यरत आहेत.

बिहारच्या 12 जिह्यांना पुराचा फटका बसला असून गेल्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 92 वर गेली आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुराचे पाणी कमी होत असले तरी बागमती, बूढी गंडक, कमला बलान, अधवारा आणि महानंदा या नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

आसामच्या 24 जिह्यांत पूरस्थिती

आसाम राज्यात एकूण 33 जिल्हे असून त्यापैकी 24 जिह्यांना पुराचा फटका बसला असून मृतांची संख्या 59 वर गेली आहे, तर 48 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला असल्यामुळे लष्कराने मदतकार्य सुरू केले आहे. केरळमध्येही मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे तिघांचा बळी गेला आहे. राज्यातील प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे सर्वत्र पूर आलेला असतानाच मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाच जिह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या