पिंपरखेडात महापुराचे पाणी शिरले; गावकऱ्यांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडवणी तालुक्यात मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातला. तालुक्याच्या विविध भागांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पिंपरखेड गावांमध्ये पुन्हा एकदा महापूर आला. या महापुराचे पाणी पिंपरखेड गावामध्ये शिरले. सोमवारी महापुरामुळे दुर्घटना घडून तीन लोकांचा मृत्यू झालेल्या पिंपरखेडामध्ये आणखी पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकरी भयभीत होत गावाबाहेर आले होते. त्यांनी गावाबाहेर स्थलांतर केले आहे. प्रशासनाची मदत वेळेवर गावात पोहचली नाही. तलाठी, ग्रामसेवक यांचा कोणताही पत्ता गावात नसल्यामुळे प्रशासनाच्या वतीने कुणीही मदत करीत नव्हते. गावकऱ्यांनी एकमेकाला धीर देत पुराचा सामना केला.

वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, साळींबा या गावांमध्येही पाणी शिरले होते. तालुक्याच्या अनेक गावाचा संपर्क या पुरामुळे तुटला होता. वडवणी बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सर्व तालुक्यातील नागरिकांची एकत्रित धावपळ झाली. तालुक्यातील सर्व पिकांचा नायनाट झाला असून शंभर टक्के सोयाबीन, तूर, मूग, कापूस या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.