
सामना प्रतिनिधी, मुंबई
डफलीवर थाप मारून महाराष्ट्राच्या शौर्याची गाथा ऐकवत गावोगाव फिरणारे शाहीर आणि उमेदीच्या काळात पायांना काही किलोंचे घुंगरू बांधून ग्रामीण भागातल्या कष्टकरी वर्गाचे मनोरंजन करणाऱया लोककलावंताना आयुष्याच्या संध्याकाळी चार घास खाता यावेत यासाठी महाराष्ट्रातील लोककलावतांना मागील अनेक वर्षांपासून मानधन देण्यात येत आहे. वित्त खात्याच्या लाल फितीच्या कारभारामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातल्या किमान तीस हजार लोककलावंताना मानधन मिळालेले नाही. परिणामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासणाऱया कोलकलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्रातील तमाशा कलांवंतांपासून दशावतारी नाटकातील कलावंत, टाळकरी, गोंधळी अशा असंख्य लोककला जोपासणाऱया लोककलांवताना मागील किमान तीस वर्षांपासून दरमहा तीन हजार ते बाराशे रुपये मानधन दिले जाते. आता मनोरंजनाची अनेक साधने आली तरी पूर्वीच्या काळात शाहीरी जलसे, तमाशाची बारी, दशावताराच्या माध्यमातून राज्याच्या कष्टकरी वर्गाचे मनोरंजन केले जात असे. आता जमाना बदलला तरी अजूनही गावोगावच्या जत्रांमध्ये लोककलावंताना मागणी आहे. राज्य सरकारच्या वतीने लोककलांचे महोत्सव आयोजित केले जातात. या लोककलावंताना उतारवयात मदतीचा आर्थिक हात देण्यासाठी महाराष्ट्रातील लोककलावंताना मानधन मिळते.
मानधन किती व कसे
वयाची साठी पार केलेल्या पुरुष लोककलावंताना तर वयाची पन्नाशी पार केलेल्या महिला कलावंताना मानधन दिले जाते. ‘अ’ गटातील लोककलावंताना दरमहा तीन हजार रुपये, ‘ब’ गटातील कलावंताना दीड हजार रुपये व ‘क’ गटातील कलावंताना बाराशे रुपये मानधन मिळते.
उपासमारीची वेळ
मागील सहा महिन्यांपासून मानधन थकल्यामुळे राज्यातल्या सुमारे तीस हजार लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे असे पठ्ठेबापूराव मराठी तमाशा व लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी सांगितले. मानधनाचे 24 कोटी रुपये थकले आहेत.
लोककलावंत दुर्लक्षित
अभिनेत्री माही गीलला मारहाण झाल्याच्या घटनेची सरकारने दखल घेऊन गुंडांना अटक केली पण टाकळी लोणारमधील श्रीगोंद्यामध्ये बागडे तमाशा मंडळातील सात मुलींसह 19 कलाकारांना दहा ते पंधरा गावगुंडांनी मार्चमध्ये बेदम मारहाण केली, पण तरीही गावगुंड मोकाट आहेत. बॉलीवूडकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ आहे पण लोककलावंत दुर्लक्षित असल्याचा आरोप परिषदेने केला.
शासकीय निवासस्थानावर धडकणार
लोककलावंतांच्या या संघटनेने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. 25 जुलैपर्यंत लोककलावंतांचे मानधन अदा न झाल्यास राज्यातील लोककलावंत वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या शासकीय निवासस्थानी पारंपरिक वेशात आणि पारंपरिक वाद्यांसह मोर्चा काढतील असा इशारा लोककलावंत परिषदेचे भोसले यांनी दिला.


























































