जिभेचे चोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 >> मृदा झरेकर

नम्रता संभेराव म्हणजे गुणी अभिनेत्री. कॉमेडीची राणी. प्रत्येक व्यक्तिरेखा ती जीव ओतून साकारते. लोकांना हसवण्याचा आणि आनंद पसरवण्याचा अप्रतिम गुण तिच्याकडे आहे.

 सर्वोत्तम अभिनेत्रीसह नम्रता सुगरण आहे. तिला घरचे जेवण आवडते. त्यामुळे सेटवर ती घरचे जेवणच घेऊन जाते. तिला आईच्या हातची पुरणपोळी अतिशय आवडते. त्यातही भरपूर पुरण भरलेली गव्हाची पुरणपोळी तर एक नंबर. सासूबाईंच्या हातचा पुलाव तिला फार आवडतो.  स्वतः बनवलेली खिचडीसुद्धा प्रिय. जिरे न टाकता वेगळय़ा पद्धतीने ती खिचडी बनवते. तिने  बनवलेली खिचडी पूर्णपणे तुपात आणि उकडलेले बटाटे व दाण्याचा कूट बारीक घालून तयार होते. त्यामुळे नम्रताच्या हातची  खिचडी एकदम मऊसूत आणि मस्त होते.

नम्रता रेस्टॉरंटमध्ये गेली तरी तिथे भाकरी खाण्यास प्राधान्य देते.  चायनीज तर तिला अजिबात आवडत नाही. गोड पदार्थांमध्ये सिझलिंग ब्राउनी फारच प्रिय. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सिझलिंग ब्राऊनी ही स्वीट डिश तर पक्की. रबडी, जिलेबी, चॉकलेट केक, चोको लावा केक हे सगळे गोड पदार्थ आवडतात. चॉकलेट केक हा असा पदार्थ आहे, जो नम्रता अगदी जेवणासारखं खाऊ शकते.

तिचा नवीन स्वयंपाक शिकत असतानाचा किस्सा भन्नाट आहे. तिने पोहे भिजत घालताना खूप पाणी वापरले. अगदी तांदूळ भिजत घालतो तसे पोहे भिजवले. पोह्यांचे काय झाले असेल ते वेगळं सांगायला नको. आता मात्र ती खूप छान स्वयंपाक करते. तिला खायला ही आवडते. सकाळचा पहिला चहा हा मस्त गोड, त्यात आले, वेलची, गवती चहा, भरपूर चहा मसाला टाकून असलेला चहा त्यांना गरजेचाच वाटतो. नंतर दिवसभरातल्या चहाला अशी चव नसली तरीही चालेल, पण सकाळचा पहिला चहा असाच मस्त असला तर दिवसाची सुरुवात उत्तम होते. सगळं खा, थोडय़ा वेळच्या अंतराने खा, पण थोडे-थोडे म्हणजेच प्रमाणात खा. पोटाचे नाही हे आपले जिभेचे चोचले असतात. जिभेला सारखी चालना लागते. दिवसातून एक तास स्वतःसाठी द्या, स्वतः व्यायाम करा, शरीराची काळजी घ्या.

 नम्रता म्हणते, स्ट्रीट फूडबद्दल बोलायला घेतले तर तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी, सुखी भेळ, ओली भेळ खायला मज्जा येते, पण सर्वात जास्त मज्जा सुखापुरी खायला येते. सुखापुरीची त्या एक वेगळी प्लेट ती खाऊ शकते.