
जनसंघाच्या कार्यकर्त्या व पदवीधरच्या माजी आमदार कुमुद माधवराव रांगणेकर (93) यांचे नाशिक येथे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
संभाजीनगर येथील खाराकुआँ भागात राहणाऱ्या कुमुद रांगणेकर या जनसंघाचे तर त्यांचे पती माधवराव रांगणेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहत होते. 1978 ते 1984 या काळात विदर्भ व मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्राच्या पदवीधर मतदारसंघाच्या त्या आमदार होत्या. मूळ मुंबईच्या रहिवासी असलेल्या रांगणेकर 1958 पासून संभाजीनगरात स्थायिक झाल्या. रामभाऊ गावंडे, हरिभाऊ बागडे, मधुकरराव जोशी, शालिग्राम बसैये व पदमा कुलकर्णी हे जनसंघाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. उत्तम लेखिका असलेल्या कुमुद रांगणेकर या मधुगंध साहित्य मंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे 7 काव्यसंग्रह व स्फुट लेखांचा एक संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 1984 ते 2007 या काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे.

























































