
सामना प्रतिनिधी । मुंबई
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचे मुंबईत सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. उद्या सकाळी अश्विनी नौदल तळावर त्यांना नौदलातर्फे अंतिम निरोप देण्यात येणार असून त्यानंतर पुणे गोळीबार मैदान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जयंत नाडकर्णी थायरॉईड कॅन्सरच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि परिवार आहे. १४ वे नौदल प्रमुख म्हणून त्यांची १ डिसेंबर १९८७ रोजी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबर १९९० पर्यंत ते नौदलाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. मार्च १९४९ मध्ये त्यांनी रॉयल इंडियन नेव्हीमध्ये प्रवेश केला. जयंत गणपत नाडकर्णी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३१ रोजी झाला. त्यांनी टीएस डुफ्फेरीन येथे आपले प्रशिक्षण घेतले आणि नौदलात प्रवेश केला. डार्टमाऊथ येथील रॉयल नेव्हल कॉलेज येथे त्यांनी मुलभूत प्रशिक्षण घेतले होते. इस्टर्न नेव्हल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडींग म्हणून त्यांनी आयएनएस दिल्ली (१९४८) आणि आयएनएस तलवार (१९५९) काम पाहिले. १९६५ चे लिबरेशन ऑफ गोवा इंडो -पाकिस्तानी युद्ध, १९६५ आणि १९७१ चे हिंदुस्थान -पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, नौसेना सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आले होते.

























































