
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. प्रकाशसिंह बादल हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ‘गॅस्ट्राइटिस’ आणि श्वास घेण्याचा त्रास होता. मात्र उपचारादम्यान मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाशसिंह बादल यांच्यावर बुधवारी भटिंडा येथील त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रकाशसिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोटय़ाशा गावात झाला. 1957 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पंजाब विधानसभेची 2022 ची शेवटची निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. वयोमानापरत्वे त्यांना ही निवडणूक लढवायची नव्हती, पण पंजाबमधील अकाली दलाची दयनीय अवस्था पाहून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
केंद्र सरकारकडून पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बादल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रकाशसिंह बादल यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. देशाच्या राजकारणातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी होते. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि महत्त्वाच्या काळात राज्याला साथ दिली, अशा शोकभावना पंतप्रधान मोदींनी ट्विट करत व्यक्त केल्या.
सरपंच ते मुख्यमंत्री
- प्रकाशसिंह बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली आणि जिंकली.
- 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला.
- 1969-70 पर्यंत ते पंचायतराज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांचे मंत्री होते. 1970 मध्ये ते पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 1977 च्या निवडणुकीत अकाली दल आणि जनता पक्षाने मिळून सरकार स्थापन केले आणि प्रकाशसिंह बादल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ते 1977 पासून 1980 पर्यंत सत्तेत होते.
- त्यानंतर 1997 ते 2002 या काळात ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा पाच वर्षे राज्य केले.
- 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017 मध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनून बादल यांनी पंजाब राज्यासाठी नवा राजकीय विक्रम रचला. याशिवाय तीन वेळा ते विरोधी पक्षनेतेही होते. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना प्रकाशसिंह बादल हे खासदार म्हणूनही निवडून आले होते.

























































