लोणी गोळीबार प्रकरणी चौघांना अटक

665

राहाता तालुक्यातील लोणी गावात रविवारी रात्री एका तरूणावर गोळीबार करणार्‍या आरोपींना चोवीस तासांत स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये चार आरोपींचा समावेश असून सर्व आरोपींना नाशिकमध्ये येवाला आणि पुणे येथील शिरूर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये राहाता गावात रविवारी रात्री एकच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता. त्यात एका तरूणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. फरदीन ऊर्फ भय्या आब्बू कुरेशी (वय18, रा.श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे.

फरदीन आब्बू कुरेशी याला आरोपी सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, संतोष सुरेश कांबळे, शाहरूख उस्मान शहा (सर्व रा.श्रीरामपूर) यांनी जबरदस्तीने, धमकावत नाशिकला नेले. त्यानंतर पुन्हा लोणीत आणले. उमेश नागरे, अरूण चौधरी, अक्षय बनसोडे व शुभम कदम सर्व (रा.राहता) या सर्व मित्रांनी मिळून काहीतरी वादाचे कारण काढून गोळीबार करून फरदीनची हत्या केली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तातडीने अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथके नेमून अवघ्या 24 तासात वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, संतोष सुरेश कांबळे, शाहरूख उस्मान शहा (सर्व रा.श्रीरामपूर), अरूण भास्कर चौधरी (लोणी प्रवारा, ता.राहाता) या आरोपींना अटक केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या